संगीत रंगभूमीच्या ‘शिलेदार’ हरपल्या, Classical singer theater Jaimalabai Shiledar Demise today in Pune

संगीत रंगभूमीच्या ‘शिलेदार’ हरपल्या

संगीत रंगभूमीच्या ‘शिलेदार’ हरपल्या
www.24taas.com , झी मीडिया, पुणे

मराठी संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ रंगकर्मी जयमालाबाई शिलेदार यांचं पहाटे पुण्यात वृद्धापकाळानं निधन झालं. पहाटे 2 च्या दरम्यान पुण्यातल्या पं. दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्या 86 वर्षांच्या होत्या. जयमालाबाईंच्या निधनानं संगीत रंगभूमीच्या ‘शिलेदार’च हरपल्या अशी प्रतिक्रिया संगीत क्षेत्रात व्यक्त होतेय.

सकाळी 12 वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. संगीत रंगभूमीच्या पडत्या काळात रंगभूमीला जगवण्यासाठी त्यांनी अथक प्रयत्न केलेत. संगीत रंगभूमीवर स्वतःची परंपरा सांगणाऱ्या आणि बालगंधर्वांच्या बरोबरीनं काम केलेल्या कलाकार म्हणून जयमाला शिलेदार यांची ओळख होती. संगीत शाकुंतल, संगीत स्वयंवर, संगीत सौभद्र, संगीत एकच प्याला, संगीत शारदा ही जयमालाबाईंची गाजलेली नाटकं.

बेळगावमध्ये १९२६ साली त्यांचा जन्म झाला. त्यांच्या वडीलांचं नाव नारायणराव जाधव होतं. बेळगावमध्ये दोन वर्षं गायकीचं शिक्षण घेतल्यानंतर पुढील शिक्षण त्यांनी जयपूर घराण्याच्या मोगुबाईंकडे घेतलं. १९४२पासून मराठी रंगभूमीवर अनेक अजरामर भूमिका यांनी केल्या. २००३ मध्ये त्यांची मराठी नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदासाठी एकमतानं निवड झाली होती. हे नाट्यसंमेलन अहमदनगर इथं भरवण्यात आलं होतं. जयमालाबाईंना तीन वेळा बालगंधर्व पुरस्कार, २००६मध्ये लता मंगेशकर पुरस्कार, तर यंदा पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. त्यांच्या निधनामुळं संपूर्ण संगीत क्षेत्रावर आणि संगीतप्रेमींवर शोककळा पसरलीय


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, August 8, 2013, 08:32


comments powered by Disqus