जात पडताळणीसाठीसाठी ठिय्या आंदोलन - Marathi News 24taas.com

जात पडताळणीसाठीसाठी ठिय्या आंदोलन

योगेश खरे, www.24taas.com, नाशिक
 
नाशिक महापालिकेच्या निवडणुकांसाठी जात पडताळणी मिळत नसल्यानं इच्छुक उमेदवार अडचणीत सापडले आहेत. अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवाराला पडताळणी बंधनकारक केल्यानं कार्यालयांमध्ये गर्दी झाली आहे. अखेर ठिय्या आंदोलन करत उमेदवारांनी दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यानं प्रशासनाचीही कोंडी झाली आहे.
 
पालिका निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक पंधरामधून सुभाष मुंडे हे इच्छुक उमेदवार आहेत. मागील तीन महिन्यांपासून ते जात पडताळणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात खेटे घालत आहेत. मात्र वेगवेगळ्या सबबी देऊन प्रशासनाकडून टाळाटाळ केली जात आहे. आता उमेदवारी भरण्याचा दिवस आला तरी प्रमाणपत्र मिळत नसल्यानं सरकारी कामावर सुभाष मुंडे संतप्त झाले आहेत.
 
जात पडताळणीला विलंब होत असल्यानं संतप्त इच्छुक उमेदवारांनी अधिकाऱ्यांना घेराव घालून त्यांचा रोष व्यक्त केला. उमेदवारांच्या जास्त संख्येमुळं आधीच संथ असलेलं सरकारी काम जास्तच वेळखाऊ झालं आहे. तर निवडणूक निर्णय अधिकारीही नियमावर बोट ठेवत असल्यानं, आता करायचं तरी काय असा सवाल उपस्थित झाला आहे. प्रशासनानं कामकाज गतीमान केलं नाही तर जात पडताळणी अभावी अनेक इच्छुकांना निवडणूक लढवता येणार नाही, हे मात्र खरं.

First Published: Wednesday, January 25, 2012, 23:11


comments powered by Disqus