गुन्हेगारांना उमेदवारी, पक्षांची स्ट्रॅटेजी भारी! - Marathi News 24taas.com

गुन्हेगारांना उमेदवारी, पक्षांची स्ट्रॅटेजी भारी!

झी 24 ताससाठी पुण्याहून नितीन पाटोळे
पुण्यात गुन्हेगारांना उमेदवारी देण्यात कुठलाच पक्ष मागे नाही. सगळ्याच पक्षांनी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांना उमेदवारी दिलीय. तर काही ठिकाणी त्यांच्या नातेवाईकांना रिंगणात उतरवण्याची नवी स्ट्रॅटेजी पक्षांनी आखलीय.
 
महापालिका निवडणुकीत गुन्हेगारांना उमेदवारी देताना राजकीय पक्षांनी यंदा वेगळी स्ट्रॅटेजी वापरलीय. गुन्ह्याचे आरोप असणा-यांना मागच्या दारानं निवडणुकीच्या रिंगणात प्रवेश देण्यात आलाय. म्हणजेच त्यांच्या नातेवाईकांना तिकीटं वाटण्यात आलीयत.
 
खुनाच्या गुन्ह्यात दोषी असलेल्या भाजपच्या दत्ता खाडे यांच्या पत्नीला प्रभाग क्रमांक 24 मधून भाजपचं तिकीट मिळालंय. तर कुख्यात गुंड आणि सध्या तुरुंगात असणा-या गजा मारणेंच्या पत्नीला मनसेनं तिकीट दिलंय. तर राष्ट्रवादीनं गुंड गणेश मारणेच्या बहिणीला वारजेमधून रिंगणात उतरवलंय.
 
सगळ्याच पक्षांनी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांनाच थेट तिकीट दिलंय. काँग्रेसकडून दीपक मानकर रिंगणात आहेत. तसंच अन्या डॉन नावानं ओळखल्या जाणा-या अनिल जाधव यांना उमेदवारी दिलीय. गुन्हागारी पार्श्वभूमी असलेल्या शंकर पवार आणि त्यांच्या पत्नीलाही काँग्रेसनं रिंगणात उतरवलंय. तर आंदेकर टोळीतल्या उदयकांत आंदेकर यांना राष्ट्रवादीनं उमेदवारी बहाल केलीय. भाजपनं खुनाचा गुन्हा असलेल्या रवींद्र साळेगावकरांना तिकीट दिलंय.
 
महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यातच गुंडगिरीचं असं पीक आलंय. त्यामुळे इतर ठिकाणी काय परिस्थिती असेल याचा अंदाज येण्यासाठी पुण्याचं हे उदाहरण पुरेसं आहे.

First Published: Friday, February 3, 2012, 20:35


comments powered by Disqus