पुण्यात महापौर विरूद्ध स्थायी समिती अध्यक्ष - Marathi News 24taas.com

पुण्यात महापौर विरूद्ध स्थायी समिती अध्यक्ष

www.24taas.com, पुणे
 
पुण्यात प्रभाग ३९ ब मधली महापौर मोहनसिंग राजपाल विरुद्ध स्थायी समिती अध्यक्ष गणेश बीडकर यांच्यातही लढत चुरशीची ठरणार आहे. उमेदवारांबरोबरच या लढतीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपच्या नेत्यांचीही प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
 
पुण्यातला प्रभाग ३९ ब वॉर्ड चर्चेत आहे. सर्वाधिक चुरशीची लढत या वॉर्डात पहायला मिळते आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे महापौर मोहनसिंग राजपाल विरूद्ध स्थायी समितीचे अध्यक्ष गणेश बीडकर यांच्यात काट्याची टक्कर आहे. एक शहराचा प्रथम नागरिक तर दुसऱ्याच्या हातात महापालिकेच्या तिजोरीच्या चाव्या आहेत. एक अजितदादांचा विश्वासू तर दुसरा विकास मठकरींचा शिलेदार अशी ही झुंज आहे. विकासकामं आणि पारंपरिक मतांच्या जोरावर बाजी मारण्याचा गणेश बीडकरांना विश्वास आहे.
 
महापौर राजपाल स्वताच्या चांगल्या प्रतिमेचा फायदा उठवण्याच्या प्रयत्नात आहेत. मतदार संघात असलेला दांडगा संपर्क ही त्यांची जमेची बाजू. बीडकर हे पैशाच्या जोरावर तर आपण स्वत:च्या माणसांच्या जोरावर लढत देतो आहे असं राजपाल यांचा दावा आहे.
 
बीडकर आणि राजपाल हे दोघेही तुल्यबळ आहेत. त्यामुळं आता मतदारांना कुणाला महापालिकेत पाठवायचं कुणाला घरी बसवायचं याचा निर्णय घेणं अवघड आहे. ही लढत शेटचं मत मोजेपर्यंत रंगतदार ठरण्याची चिन्हं आहेत.
 
 
 

First Published: Monday, February 6, 2012, 23:50


comments powered by Disqus