Last Updated: Saturday, February 11, 2012, 09:02
नितीन पाटोळे, www.24taas.com, पुणे पुण्यातल्या कोथरुड भागातल्या प्रभाग क्रमांक २८ मधल्या बिग फाईटकडं पुणेकरांचं लक्ष लागलं आहे. दोन विद्यमान नगरसेवकांच्या लढतीसोबत कुख्यात गुंड गजा मारणेची पत्नीही निवडणुकीच्या रिंगणात आहे.
पुण्यातल्या कोथरुड परिसरातल्या प्रभाग क्रमांक २८ मधल्या चुरशीच्या लढतीकडं पुणेकरांचं लक्ष आहे. कारण या प्रभागातून दोन दिग्गज नगरसेवक आमने-सामने तर आले आहेत, शिवाय कुख्यात गुंड गजा मारणेची पत्नीही या प्रभागातून मनसेच्या तिकीटावर रिंगणात आहे. शिवसेनेचे गटनेते शाम देशपांडे आणि मनसेचे विद्यमान नगरसेवक किशोर शिंदे यांच्यात ही लढत होत आहे. शिंदे यांचा जुना संपूर्ण वॉर्ड या प्रभागात आला आहे. गेल्या पाच वर्षात केलेल्या कामांमुळं पुन्हा जिंकू असा विश्वास शिंदे यांना आहे. मारणेंच्या उमेदवारीमुळं फायदाच होईल असंही शिंदे सांगतात.
शिंदे यांना विजय सोपा वाटत असला तरी शिवसेनेच्या शाम देशपांडेंनी त्यांच्यासमोर तगडं आव्हान उभं केलं आहे. नगरसेवकपदाच्या १० वर्षांच्या कार्यकाळात प्रभागाबाहेर केलेली कामं आणि स्थायी समितीचे अध्यक्ष असताना केलेली कामे यामुळं निश्चित जिंकू असा विश्वास शाम देशपांडे यांनी व्यक्त केला. मनसेच्या स्थापनेपूर्वी शिंदे यांनी देशपांडे यांचे ज्यूनियर सहकारी म्हणून काम केलं आहे. आता मात्र दोघे आमने सामने आले आहेत. जूने जाणते देशपांडे विजश्री खेचून आणणार की मनसेचा तरुण शिलेदार त्यांना आस्मान दाखवणार याकडचं पुणेकरांचं लक्ष लागलं आहे.
First Published: Saturday, February 11, 2012, 09:02