Last Updated: Wednesday, February 22, 2012, 16:45
www.24taas.com, नाशिक 
राज ठाकरेंसाठी नाशिक हा मतदारसंघ बालेकिल्ला ठरण्याची चिन्ह दिसत आहे. नाशिकने यावेळी मनसेचे ४० नगरसेवक निवडून देत पुढच्या विधानसभा निवडणूकीसाठी मनसेच्या आशा पल्लवित केल्या आहेत. नाशिक हा खरतर मनसेसाठी प्रतिष्ठेचा आणि राज यांच्यासाठी सर्वात आवडीचा असा मतदार संघ ठरतो आहे. लोकसभा आणि विधानसभा अशा दोन्ही निवडणूकीत मनसेला नाशिककरांनी चांगलच मताधिक्य दिलं आहे.
विधानसभेला तीन आमदार देणारं नाशिक महानगरपालिकेला मनसेच्या पारड्यात काय टाकणार याकडे साऱ्याच राजकिय पक्षाचं लक्ष लागलं होतं. मागच्या निवडणुकीत युतीनं मताधिक्याची मोट बांधल्याने युतीच्या साम्राज्याला सुरुंग लावण्याचं कसब राज याना पार पाडायचं होतं. यावेळेस शिवसेना आणि भाजप एकत्र न लढता एकमेंकाच्या विरोधात लढले आणि तीच बाब मनसेच्या पथ्यावर पडली. त्यातच नाशिक म्हणजे राष्ट्रवादीचा आणि भुजबळांचा बालेकिल्ला.
भुजबळांनाही यावेळी नाशिक महापालिकेवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकावयाचा होता. पण नाशिकमधल्या वाढत्या गुंडगिरीचा मुद्दा राज यानी प्रचाराच्या मुद्दयात अग्रस्थानी घेतला आणि नाशिककरांच्या थेट मनाला आणि मतालाच हात घातला गेला. केवळ शिवसेनेच्याच नाही तर भुजबळांच्या वर्चस्वाच्या स्वप्नाला त़डा देत मनसेनं ४० जागांवर विजय मिळवला. नाशिक महापालिकेवर मनसेचा पहिला महापौर बसणार की नाही याच चित्र थोड्याच दिवसात स्पष्ट होईल. पण शिवसेनेला आव्हान देतानाच भुजबळानाही दुखावलं गेल्यानं मनसेला आपल्या आमदारांच्या जागा राखणं आणि मनसेच्या जागा वाढवण अशा दोन्ही तारेवरची कसरत करावीच लागणार आहे.
First Published: Wednesday, February 22, 2012, 16:45