Last Updated: Friday, March 9, 2012, 08:19
मुकुल कुलकर्णी, www.24taas.com, नाशिक नाशिकच्या महापौर निवडणुकीबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. महापौर निवडणुकीला स्थगिती मिळण्यासाठी दाखल केलेल्या याचिकेवर न्यायालयाने महापालिकेला नोटीस बजावली आहे.
नाशिककरांनी दिलेल्या त्रिशंकू कौलामुळे, सत्ता कोण स्थापणार याबाबत कुतूहल आहे. सत्तास्थापनेसाठीच्या वेगवेगळ्या समीकरणांची चर्चा रंगली असतानाच आता या सर्व चर्चांना ब्रेक लागतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. निवडणुकीनंतर मोठ्या प्रमाणावर बोगस व्होटिंग कार्ड तयार करण्यात आल्याचं प्रकरण उघडकीस आलं होतं. त्यामुळे महापौरपदाच्या निवडणुकीला स्थगिती मिळावी अशी याचिका मुशीर सैय्यद यांनी जिल्हा न्यायालयात दाखल केली आहे. न्यायालयाने प्रभाग क्र. ३९ मधून विजयी झालेले मनसेचे नगरसेवक गुलजार कोकणी आणि महापालिका प्रशासनाला नोटीस बजावून १२ मार्चला न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
नवी समीकरणं काय तयार होतात याची आकडेमोड सुरू असतानाच महापौर-उपमहापौरपदासाठी अर्ज विक्री आणि स्वीकृतीला सुरुवात झाली आहे. मात्र, आता न्यायालय काय निर्णय देतंय, त्यावरच महापौरपदाची निवडणूक नियोजित वेळेत होते की नाही ते ठरणार आहे.
First Published: Friday, March 9, 2012, 08:19