पिंपरीमध्ये अजितदादा कोणावर झाले खूश.. - Marathi News 24taas.com

पिंपरीमध्ये अजितदादा कोणावर झाले खूश..

www.24taas.com, पिंपरी-चिंचवड
 
पिंपरी-चिंचवडच्या महापौरपदी मोहिनी लांडे यांची निवड होणं ही फक्त औपचारिकता उरली आहे. मोहिनी लांडे यांच्या निवडीमुळे विलास लांडेंची ताकद मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. आता येत्या काळात पिंपरीमधल्या राष्ट्रवादीतल्या चार सुभेदारांमध्ये चांगलाच संघर्ष रंगणार आहे.  पिंपरी-चिंचवडच्या महापौरपदी मोहिनी लांडे यांच्या निवडीचे शहराच्या राजकारणावर दूरगामी परिणाम होणार आहेत.
 
आमदार विलास लांडे, लक्ष्मण जगताप, अण्णा बनसोडे आणि शहराध्यक्ष आझम पानसरे यांच्या प्रभावामुळेच अजित पवारांची पिंपरीमध्ये ताकद आहे. या चौघांच्या राजकीय महत्वाकांक्षेमुळे अनेक वेळा संघर्षही झाला आहे. सध्या तरी पत्नीला महापौरपद देत विलास लांडे यांनी बाजी मारली आहे. अर्थात मोहिनी लांडे यांनी मात्र सर्वांचंच योगदान असल्याचं सांगितलं आहे.
 
पिंपरीवर पकड रहावी यासाठी आमदार लक्ष्मण जगताप, अण्णा बनसोडे आणि आझम पानसरे यांनी जोरदार मोर्चेबांधणी केली. पण लांडेंचीच सरशी झाली. लांडे यांचे बंधू, जावई आणि भाचे असं मिळून घरातच पाच नगरसेवक आहेत. तर त्यांचे दूरचे अनेक नातेवाईक नगरसेवक आहेत. आता येत्या काळातही पिंपरीच्या या चार सुभेदारांमध्ये संघर्ष सुरूच राहणार आहे. त्यामुळे पिंपरीमध्ये वर्चस्व ठेवण्यासाठी अजित पवारांनाही मोठी कसरत करावी लागणार आहे.
 
 

First Published: Monday, March 12, 2012, 21:51


comments powered by Disqus