Last Updated: Monday, March 12, 2012, 23:16
www.24taas.com, नाशिक 
नाशिक महापालिकेच्या सत्तास्थापनेचा तिढा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. एकीकडे महायुतीचा धर्म पाळणार, असं भाजप म्हणत आहे. तर त्याचवेळी जनादेशाचा आदर राखला जाईल, असं म्हणत मनसेला पाठिंब्याचे संकेतही भाजपनं दिले आहेत. त्यामुळे भाजपच्या भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
नाशिकमध्ये सत्ता कोणाची येणार, या प्रश्नाचं उत्तर आता भाजपच्या भूमिकेवर केंद्रीत झालं आहे. पण भाजपनं आतापर्यंत तळ्यात मळ्यात सुरूच ठेवलं आहे. एकीकडे शिवसेनेबरोबरच महापौर आणि उपमहापौरपदाची निवडणूक लढवू असं भाजप नेते म्हणत आहेत.
त्याचवेळी अज्ञातस्थळी जाताना मात्र भाजपचे नगरसेवक शिवसेना नगरसेवकांबरोबर नव्हते. तर दुसरीकडे जनादेशाचा आदर राखला जाईल, असं म्हणत भाजप प्रदेशाध्यक्षांनीच मनसेला पाठिंबा देण्याचे संकेत दिले होते. त्याचबरोबर भाजपच्या स्थानिक नेत्यांचा कलही मनसेबरोबरच आहे.
विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजप शिवसेनेबरोबर जायचं की मनसेबरोबर याची चाचपणी करत आहे. पण या धरसोड वृत्तीचा भाजपला फटका बसेल, अशी शक्यता वर्तवली जाते आहे. शिवसेनेबरोबर गेलं तरी भाजपचा महापौर आणि मनसेबरोबर गेलं तरी भाजपचा महापौर अशी भाजपची खेळी आहे. पण आता या राजकीय घडामोडींमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काय चाल खेळतात, यावर पुढची गणितं अवलंबून आहेत.
First Published: Monday, March 12, 2012, 23:16