Last Updated: Wednesday, May 9, 2012, 13:34
www.24taas.com, नाशिक नाशिकमध्ये सातपूर औद्योगिक वसाहतीतल्या महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीला भीषण आग लागलीय. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे दहा बंब घटनास्थळी पोहोचले आहेत. आग विझवण्यासाठी शर्थीनं प्रयत्न सुरू आहेत.
महिंद्रा ऍण्ड महिंद्रा कंपनीतील स्कॉर्पिओ आणि झायलो प्लॅन्टच्या स्पेअर पार्ट विभागाला लागलेल्या आगीत कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. आज पहाटे पाचच्या सुमारास आग पसरली. आगीचे निश्चित कारण समजू शकले नाही. या आगीत महिंद्रा कंपनीच्या विविध वाहनांचे स्पेअरपार्ट तसेच केमिकल्सने भरलेल्या टाक्या आणि स्टोअरमधील इतर साहित्य जळून खाक झाले आहे. आगीचे वृत्त कळताच अग्निशामक दलाचे तीस बंब तातडीने घटनास्थळी पोहोचले.

कंपनीच्या अग्निशमन विभागानेही आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. आग विझविण्यासाठी तब्बल तीन तास अग्निशमनदलाच्या जवानांनी आगीशी झुंज देऊन सकाळी आठच्या सुमारास आग आटोक्यात आणली. तो पर्यंत घटनास्थळी कोणीही पोहोचू शकले नाही. त्यामुळे नेमके किती नुकसान झाले याचा अंदाज अद्याप आलेला नाही. गेल्या दोन महिन्यात शहरातील मोठ्या आगीची ही चौथी घटना आहे.
यापूर्वी विकास थिएटर, वडाळा गावातील भंगार दुकान व त्यानंतर काही दिवसांपूर्वीच साखलाज मॉलला लागलेल्या आगीने कोट्यावधींचे नुकसान झालेले आहे. आगीच्या वाढत्या घटनांमुळे होत असलेल्या कोट्यावधी रुपयांच्या हानीमुळे उलट-सुलट चर्चांना उधाण आले आहे.
First Published: Wednesday, May 9, 2012, 13:34