Last Updated: Tuesday, October 8, 2013, 21:21
www.24taas.com, झी मीडिया, पुणेबनावट कागदपत्रांच्या आधारे वेगवेगळ्या कंपन्यांच्या मालकीची ३३ हेक्टर जमीन स्वत:च्या कंपनीच्या नावावर करून घेतल्याप्रकरणी प्रतीककुमार प्रफुलकुमार शहा या पुण्यातल्या व्यावसायिकाला पोलिसांनी अटक केलीय. न्यायालयानं त्याला बुधवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावलीय.
प्रतीककुमार हा सनशाईन इन्फ्रासिटी लिमिटेड या कंपनीचा संचालक आहे. पी ए सी एल लिमिटेड या चिटफंडशी त्याचा संबंध होता. पी ए सी एल या कंपनीच्या जमीन विकसनाशी संबंधित शिवमहिमा टाऊनशिप प्रायव्हेट लिमिटेड, टी सी डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड, आणि पी.व्ही जी डेव्हलपर्स या सिस्टर कंपन्या आहेत. पुण्याच्या सुस परिसरात या कंपन्यांच्या मालकीची शेकडो एकर जमीन आहे. या कंपन्यांच्या संचालकांनी कंपनीच्या जमीन विक्रीचे अधिकार आपल्याला दिल्याचा बनावट ठराव प्रतीक शहा यानं तयार केला होता. या ठरावाच्या आधारे त्यानं कंपन्यांच्या मालकीची ३३ हेक्टर १५ आर जमीन स्वत:च्या सनशाईन कंपनीच्या नावावर केली. २६ डिसेंबर २०११ रोजी हा प्रकार घडला होता. प्रतिककुमारने लाटलेल्या जमिनीची किंमत शेकडो कोटी रुपये आहे. या प्रकरणी पी ए सी एल च्या संचालकांनी २३ मे २०१३ रोजी पुण्याच्या हिंजवडी पोलिस स्टेशन मध्ये तक्रार दिली होती. त्यावरून प्रतिककुमार च्या विरोधात हिंजवडी पोलिस स्टेशन मध्ये कलम ४६७, ४६८, ४७१, ४२० नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे या प्रकरणाचा तपास देण्यात आला होता. तेव्हापासून पोलिस प्रतिककुमार च्या शोधात होते. मात्र तो सापडत नव्हता.
अखेर ६ ओक्टोंबर २०१३ ला चेन्नई पोलिसांनी त्याला अटक केल्याची माहिती पुणे पोलिसांना मिळाली. त्यानुसार पुणे पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन अटक केली. आरोपी प्रतिककुमारला पुण्याच्या जेएमएफसी न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं त्याला ९ ओक्टोंबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Tuesday, October 8, 2013, 21:21