डीनच्या केबिन दुरुस्तीचा खर्च, फक्त ५० लाख रुपये, 50 lakhs for dean cabin renovation in sasoon hospital

डीनच्या केबिनचा नुतनीकरण खर्च... फक्त ५० लाख रुपये

डीनच्या केबिनचा नुतनीकरण खर्च... फक्त ५० लाख रुपये
www.24taas.com, पुणे

हॉस्पिटल कोणतंही असो, तिथं रुग्णांना चांगल्या वैद्यकीय सुविधा देण्यावर सर्वाधिक भर असायला हवा. पुण्यातील ससून या शासकीय रुग्णालयात मात्र अगदी विरुद्ध स्थिती आहे. इथं एकीकडं वैद्यकीय सुविधांची प्रचंड आबाळ आहे. तर, दुसरीकडं तब्बल ५० लाख रुपये खर्च करून हॉस्पिटलचे डीन डॉ. अजय चंदनवाले यांच्या केबिनचे नुतनीकरण करण्यात येत आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठं असलेलं पुण्यातील शासकीय ससून हॉस्पिटल... हॉस्पिटलचे डीन आहेत डॉ. अजय चंदनवाले... त्यांच्या केबिनच्या नुतनीकरणाचे काम सध्या सुरु असून त्यावर जो खर्च केला जातोय त्याचा आकडा ऐकून तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. या केबिन नुतनीकरणावर तब्बल ५० लाख रुपये खर्च केले जातायत. या ५० लाखांची कशी उधळपट्टी केली जातेय, हे ऐकले तर तुम्हाला आणखी एक धक्का बसेल... या केबिनमध्ये ४३ हजारांची एक याप्रमाणे १ लाख ३० हजारांच्या तीन खुर्च्या बसवल्या जाणार आहेत. तसंच डीनच्या टेबलासाठी ९० हजार रुपये, वॉश बेसिनसाठी ९९ हजार रुपये, स्टेनो टेबलसाठी १ लाख 5 हजार रुपये, स्टाफ चेअर्ससाठी १ लाख ७ हजार रुपये, कॉन्फरन्स चेअर्ससाठी ३ लाख ३० हजार रुपये, वॉल पॅनलिंगसाठी ११ लाख ९३ हजार रुपये, टाइल्ससाठी ४ लाख ७२ हजार रुपये असा आहे या खर्चाचा तपशील...

डीन यांच्या केबिनवरची उधळपट्टी समोर आलीय ती महितीच्या अधिकारातून... आता हे महागडं नुतनीकरण बंद करण्याची मागणी आरटीआय कार्येकर्ते विहार दुर्वे यांनी केलीय. डीनच्या केबिनवर अशी लाखोंची उधळपट्टी होत असताना हॉस्पिटलच्या वैद्यकीय सुविधांची काय स्थिती आहे यावर एक नजर टाकुयात... हॉस्पीटलमधलं सी.टी. स्कॅनची दोन मशीन बंद पडलीत, डोळे आणि कान, नाक, घसा विभागाच्या ऑपरेशन थिएटरचे नुतनीकरण रखडलेलं आहे, हॉस्पिटलकडे क्याथलॅब नाही तसंच ट्रोमा युनिटदेखील नाही... आणि या सर्व वैद्यकीय सुविधा उपलब्ध नसल्याचं कारणं दिलं जातंय… ‘निधीची कमतरता’

ससूनमध्ये रुग्ण तर सोडाच येथील डॉक्टर आणि वैद्यकीय विद्यार्थ्यांनादेखील पुरेशा सुविधा नाहीत. नुतनीकरणाला विरोध नाही. मात्र, कामाची प्राथमिकता ठरवायला हवी. डीन यांनी जेवढा आपल्या कार्यालयाच्या नुतनीकरणावर रस घेतला. तेवढा रुग्णांच्या सुविधांवरही घ्यावा. हीच अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केलीय.

First Published: Friday, November 23, 2012, 20:08


comments powered by Disqus