अजितदादांनी सोडला पदभार, तरी सर्वत्र गाजवतायत अधिकार Ajit pawar still behaves like DCM

अजितदादांनी सोडला पदभार, तरी सोडवत नाहीत अधिकार

अजितदादांनी सोडला पदभार, तरी सोडवत नाहीत अधिकार
www.24taas.com,पुणे

अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पद सोडलं...मंत्रीपदं सोडली... मात्र, त्याबरोबरचे अधिकार सोडायला अजित पवार तयार दिसत नाहीत. याचा प्रत्यय पुण्यात आला. धरणातील पाणी वाटप करणाऱ्या कालवा समितीची बैठक झाली. या बैठीकीला आमदार म्हणून अजित पवार उपस्थित होते. मात्र, या बैठकीनंतर देखील अनेक अधिकारी अजित पवारांना भेटायला येत होते.

पुणे महापालिकेचे आयुक्त महेश पाठक, विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख, जिल्हाधिकारी विकास देशमुख, पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ असे सर्वच वरिष्ठ अधिकारी अजित दादांकडे आले होते. या बड्या अधिकाऱ्यांबरोबरच महसूल, जलसंपदा, उर्जा अशा इतर खात्याच्या अधिकाऱ्यांची देखील मोठी फौज या ठिकाणी आली होती. विशेष म्हणजे दादांच्या बोलावाण्यावारूनच या ठिकाणी आल्याचं या अधिकाऱ्यांनी सांगितले. याचाच अर्थ पदं सोडली तरी, अधिकार सोडायला अजित दादा तयार नाहीत. असंच चित्र पाहायला मिळालं. मंत्री म्हणून काम करताना, सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलावून घ्यायचे. आणि कामं करायची ही अजित पवारांची पद्धत होती. मात्र, मंत्री पद सोडल्यानंतर देखील त्यांची ही सवय कायम असल्याचा स्पष्ट झालाय. त्यामुळे साधे आमदार म्हणून अजित पवार अशा पद्धतीने वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलावू शकतात का. असा महत्वाचा प्रश्न पुढे आलाय.

पुण्यातील नवीन शासकीय विश्राम गृहात अजित दादांनी सर्व वरिष्ठ अधिकायांना पाचारण केले होते. मात्र, हे विश्राम गृह देखील फक्त कॅबिनेत मंत्र्यांना राखीव आहे. या विश्राम गृहातील रायगड हा सुट मंत्रीपदावर असताना कायम अजित दादांसाठीच राखीव असायचा. मात्र, आता मंत्रिपद गेल्यानंतर देखील अजित दादांचा याच सुट मध्ये मुक्काम होता. विशेष म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नियमांनुसार हे विश्राम गृह फक्त काबिनेट मंत्री किंवा त्या दर्जाच्याचा लोकांसाठी आहे. मात्र हा नियम देखील दादांसाठी शिथिल झाला आहे.

First Published: Monday, October 8, 2012, 21:37


comments powered by Disqus