Last Updated: Sunday, May 12, 2013, 13:26
www.24taas.com, झी मीडिया, सोलापूरबांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्यावर टीका करताना शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. भुजबळ यांच्यावर भ्रष्टाचाराचा ‘चिखल’ उडालाय. त्यामुळे त्यांनी तात्काळ राजीनामा दिला पाहिजे, असे उद्धव म्हणालेत.
नाशिकमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागातील अभियंता सतीश चिखलीकर आणि जगदीश वाघ यांना लाच घेताना रंगेहाथ पकडल्यानंतर चिखलीकरकडे करोडोंची बेनामी संपत्ती सापडलीय. तर अधिक चौकशी करताना स्वाती चिखलीकरच्या लॉकर्समध्ये ९ किलो सोने, चांदी तसेच लाखो रूपयांची रोकड सापडली होती. दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभागात केवळ मीच नाही तर सर्वच जण भ्रष्टाचारी आहेत, असा दावा लाचखोर अभियंता चिखलीकर आणि वाघ यांनी केलाय. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्री छगन भुजबळ चक्क तोंडावर पडलेत.
हाच धाका पकडून उद्धव ठाकरे यांनी भुजबळांवर तोंडसुख घेतले. भुजबळ तुमच्यावर चिखल उडाला आहे. तुमचेच्याच खात्याचे अधिकारी भ्रष्टाचारात गुंतले आहे. याची नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला पाहिजे, असे उद्धव म्हणालेत. त्यामुळे आता भुजबळ काय प्रतिक्रिया देतात,याकडे लक्ष लागले आहे.
दरम्यान, राज ठाकरे यांनी भुजबळांना टार्गेट केलं होतं. एका पीडब्लुडीच्या इंजिनिअरकडे एवढी संपत्ती असेल तर पीडब्लुडीच्या मंत्र्याकडे किती संपत्ती असेल? या राज ठाकरेंच्या प्रश्नाला उत्तर देताना छगन भुजबळ यांनी या प्रकरणाची संपूर्ण जबाबदारी ढकलली होती. परंतु, सार्वजनिक बांधकाम विभागात सर्वच जण भ्रष्टाचारी आहेत असा दावा चिखलीकरनं केल्यानं याची जबाबदारी भुजबळांची नसेल तर कुणाची आहे असा प्रश्न सर्वसामान्यांना पडलाय.
First Published: Sunday, May 12, 2013, 10:52