Last Updated: Wednesday, October 17, 2012, 23:43
www.24taas.com, पुणेपुणे महापालिकेच्या ठेकेदार धार्जिण्या कारभाराचा आणखी एक नमुना पुढे आलाय. महापालिकेनं खरेदी केलेल्या शंभर-दोनशे नाही तर तब्बल 22 हजार साड्या निकृष्ट दर्जाच्या निघाल्या आहेत. विशेष म्हणजे या साड्यांसाठी 47 लाख रुपये महापालिकेनं ठेकेदाराला आधीच अदा केलेत.
पुण्यातल्या नायडू हॉस्पिटलजवळच्या महापालिकेच्या गोडाऊनमध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांनी धडक दिली. निमित्त होतं महापालिकेच्या साडी खरेदी घोटाळ्याचं..... महापालिकेच्या या कार्यालयात 22 हजार साड्या अक्षरशः धूळ खात पडून आहेत. महापालिकेच्या चतुर्थ श्रेणी कर्मचा-यांससाठी या साड्यांची खरेदी करण्यात आली होती. यातल्या काही हजार साड्या कर्मचा-यांना वाटण्यात आल्या. मात्र त्या निकृष्ट असल्यानं कर्मचा-यांनी त्या परत केल्या. मात्र, तोपर्यंत महापालिकेनं ठेकेदाराला 47 लाख रुपये चुकते केले होते.
साड्या खरेदी केल्यानंतर त्या आधी लॅब टेस्टिंगला पाठवणं गरजेचं होतं. त्याचा रिपोर्ट आल्यावरच ठेकेदाराला पैसे अदा करावेत, असा नियम आहे. आता दोषी अधिका-यांवर कारवाई करण्यात येईल, असं आश्वासन सगळा घोटाळा झाल्यानंतर देण्यात येतंय.
ठेकेदाराला देण्यात आलेले लाखो रुपये सामन्य पुणेकरांनी दिलेल्या करातून आले आहेत. मात्र, महापालिका करदात्यांच्या हितासाठी नाही, तर ठेकेदाराच्या हितासाठीच काम करतेय, हेच या धूळखात असलेल्या साड्यांवरुन दिसतंय.
First Published: Wednesday, October 17, 2012, 22:50