राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेत श्रेयाची लढाई fight between NCP & Shiv Sena

राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेत श्रेयाची लढाई

राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेत श्रेयाची लढाई
कैलाश पुरी, www.24taas.com, पिंपरी-चिंचवड

अनधिकृत बांधकामावरून पिंपरी-चिंचवडमधलं राजकारण सध्या चांगलंच तापलंय. अनधिकृत बांधकाम थांबवण्याचे श्रेय घेण्यासाठी राष्ट्रवादी आणि शिवसेनेत चढाओढ लागली आहे. राष्ट्रवादीच्या दोन्ही आमदारांनी याप्रकरणी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर आता शिवसेनाही या प्रश्नावरुन मैदानात उतरली आहे.

पिंपरी-चिंचवडमधल्या अनधिकृत बांधकामांच्या पाठिशी अजितदादांचे खंदे समर्थक आमदार विलास लांडे आणि लक्ष्मण जगताप ठाम उभे राहिले आहेत. यासाठी त्यांनी थेट पत्रकार परिषद घेऊन आयुक्तांना तर टार्गेट केलेच शिवाय आठ दिवसांत यावर तोडगा न निघाल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे. नागरिकांना बेघर होऊ देणार नसल्याची भूमिका घेत प्रसंगी मुंबईतही आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

दुसरीकडं शिवसेनेनंही पत्रकार परिषद घेत याप्रकरणी दोन्ही आमदारांवर जोरदार टीका केलीय. तीन वर्षे गप्प राहणा-या आमदारांना निवडणुका जवळ येताच अनधिकृत बांधकामवाल्यांचा पुळका आल्याची टीका शिवसनेनं केली आहे.

अनधिकृत बांधकामांवरील कारवाई थांबवून त्याचे श्रेय घेण्यासाठी राष्ट्रवादी आणि शिवसेनेत चढाओढ लागलीय. त्यामुळं राष्ट्रवादीनं यात आघाडी घेतल्यानंतर शिवसेना नेतेही हिरीरीनं पुढं आलेत. त्यामुळं शहराचं वाटोळं झालं तरी चालेलं, मात्र व्होटबँक मजबूत झाली पाहिजे. यावरच या दोन्ही पक्षांचे लक्ष आहे.

First Published: Tuesday, January 22, 2013, 21:55


comments powered by Disqus