मुळा नदीच्या पात्रात हजारो मासे मृत्यूमुखी Fishes die in Mula River water

मुळा नदीच्या पात्रात हजारो मासे मृत्यूमुखी

मुळा नदीच्या पात्रात हजारो मासे मृत्यूमुखी
www.24taas.com, पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवडमध्ये वाकड इथे मुळा नदी पात्रात आज सकाळच्या सुमारास हजारो मासे मृतावस्थेत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. पालिका कर्मचा-यांनी मासे तपासणीसाठी पाठवले आहेत. पण या घटनेनंतर पुन्हा एकदा नदी प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर आलाय.

मुळा नदीत आज सकाळी अक्षरशः हजारो मासे या ठिकाणी मरण पावल्याचं समोर आलंय. यामुळे पुन्हा एकदा मुळा नदीच्या प्रदुषणाचा प्रश्न ऐरणीवर आलाय. पुणे आणि पिंपरी-चिंचवड मधल्या सर्वच नद्या देशातील सर्वाधिक प्रदुषित असल्याचं यापूर्वीच केंद्रीय प्रदूषण मंडळाच्या अहवालात स्पष्ट करण्यात आलंय. पण असं असतानाही दोन्ही शहरांच्या पालिका नदी प्रदुषणाकडे गांभीर्याने पाहताना दिसत नाही. आणि हाच निष्काळजीपणा जलचरांच्या जीवावर उठलाय.



पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या अधिका-यांनी घटनास्थळी भेट देऊन मासे आणि पाण्याचे नमुने वैद्यकीय चाचणीसाठी पाठवलेत. चाचण्यांच्या अहवालानंतरच काय ते स्पष्ट होईल असं अधिकारी सांगत आहेत. इंद्रायणी, पवना, मुळा-मुठा या नद्यांमध्ये प्रदुषणाची पातळी चिंताजनक पातळीवर आहे. जलचरांबरोबर नागरिकांचा जीवही धोक्यात आहे...पण पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका मात्र काहीच ठोस उपाययोजना करताना दिसत नाही. त्यामुळे लोकांनी पालिकेचा निष्काळजीपणाबाबत संताप व्यक्त केला आहे.

First Published: Thursday, March 21, 2013, 19:07


comments powered by Disqus