Last Updated: Monday, June 23, 2014, 18:09
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई1 जुलैपासून राज्यातल्या शाळा बेमुदत बंद ठेवण्याचा इशारा शिक्षक परिषदेनं सरकारला दिला आहे. शिक्षकांना अतिरिक्त ठरवणारा जाचक आदेश मागं घेण्याची मागणीही या शिक्षक परिषदेची आहे. या प्रकरणी 27 जून रोजी हजारो शिक्षक मुंबईत मोर्चा काढणार आहेत.
राज्यातल्या अनुदानित शाळातल्या हजारो शिक्षकांना अतिरिक्त ठरवणारा जाचक आदेश राज्य सरकारच्या शिक्षण विभागानं काढला आहे. हा आदेश मागे घेतला नाही तर १ जुलै २०१४ पासून राज्यातल्या सर्व शाळा बेमुदत बंद राहतील असा निर्णय आज महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेनं घेतलाय. शिक्षण परिषदेच्या कल्याण इथं झालेल्या बैठकीत शिक्षक परिषदेचे राज्य अध्यक्ष वेणूनाथ कडू, शिक्षक आमदार रामनाथ मोते, शिक्षक आमदार नागो गाणार यांनी ही घोषणा केली.
आंदोलनाचा भाग म्हणून शिक्षक परिषदेच्यावतीनं २५ जून २०१४ या दिवशी राज्यातले सर्व तर विदर्भात २६ जून या दिवशी जिल्हा शिक्षणाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन देण्यात येणार आहे. तर २७ जूनला आझाद मैदानात हजारो शिक्षक आंदोलन करणार आहेत. आंदोलनाचं नेतृत्व विनोद तावडे आणि देवेंद्र फडणवीस करणार आहेत.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Monday, June 23, 2014, 18:09