`आरक्षण` या शब्दाचाच मला तिटकारा आहे- राज ठाकरे, I hate the word `Reservation`- Raj Thackeray

`आरक्षण` या शब्दाचाच मला तिटकारा- राज ठाकरे

`आरक्षण` या शब्दाचाच मला तिटकारा- राज ठाकरे
www.24taas.com, झी मीडिया, पुणे

पुण्यामध्ये आज मनसे महिला आघाडीच्या सातव्या वर्धापन दिनी महिला मेळाव्यात राज ठाकरे यांनी मनसेच्या महिला कार्यकर्त्यांना संबोधित केलं. स्त्री शक्तीबद्दल आपले विचार मांडताना राज ठाकरे यांनी जातीयवादापासून ते महिलांच्या मूलभुत सुविधा अशा विविध विषयावर आपले मत मांडले.

महिला आज पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून लढत आहेत. त्यामुळे त्यांना उपदेश करणारा मी कोण? असा खडा सवाल राज ठाकरे यांनी केला आणि आपण महिलांना सल्ला द्यायला आलो नसल्याचं स्पष्ट केलं. याच बरोबर महिला आरक्षणावरही राज ठाकरे यांनी टीका केली.

आरक्षण या शब्दाचाच आपल्याला तिटकारा असल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलं. महिला आरक्षण हा शब्दच आपल्याला पसंत नसल्याचं ते म्हणाले. “जगात केवळ दोनच जाती आहेत. एक स्त्री आणि एक पुरूष. यातील एका जातीला आरक्षण दिलं, तर दुसऱ्या जातीचं काय?” असा प्रश्न राज ठाकरेंनी विचारला. तसंच ओपन मतदारसंघात महिलांनी का उभं राहू नये? असा सवालही त्यांनी केला.

आरक्षणावर टीका करताना राज ठाकरेंनी जातीवादावर घणाघाती हल्ला केला. “मला जात कळत नाही. मला घरात ती कधी शिकवली गेली नाही. माझ्यासाठी काम महत्वाचं, जात नाही.” अशा शब्दांत राज ठाकरेंनी जातव्यवस्थेवर हल्ला चढवला.

महिलांना प्रेरणादायी असणाऱ्या महिलांची उदाहरणं आपल्या भाषणात राज ठाकरे यांनी दिली. वीरमाता जिजाबाईंपासून ते तालिबानविरुद्ध लढा पुकारणाऱ्या पाकिस्तानी मलाला, तसंच रोझा पार्क्सपर्यंत जागतिक स्तरावरील अनेक महिलांची उदाहरणं राज ठाकरे यांनी दिली. मार्टिन ल्युथर किंग यांच्या आंदोलनाची सुरूवात करून देणारी एक स्त्रीच असल्याची आठवण आपल्या भाषणातून यावेळी राज ठाकरेंनी केली.

आपल्या घरातील महिलांबद्दल बोलताना राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं, की माझ्या नावावर कुठलीही प्रॉपर्टी नाही. घर, गाड्य़ा अशी सर्व प्रॉपर्टी आई आणि पत्नी या महिलांच्या नावावर आहे. कारण पुरूष नव्हे, तर महिलाच कुटुंब प्रमुख असतात, असं राज ठाकरे म्हणाले.

महिलांचसाठी आवश्यक असणाऱ्या सार्वजनिक शौचालयाच्या प्रश्नाचाही या वेळी राज ठाकरेंनी पुनरुच्चार केला. राजकारणात आलेल्या महिलांनी महिलांचे मूलभूत प्रश्न सोडवायला हवेत. राजकारणातील कुठलेही पद भुषवत असाल, तर प्रथम महिलांच्या शौचालयासारख्या अत्यावश्यक असणाऱ्या सुविधेचा प्रश्न तुम्ही सोडवायला हवा असा आदेश राज ठाकरेंनी दिला. जर तुम्ही महिलांचे मूलभूत प्रश्न सोडवू शकत नसाल, तर तुम्ही राजकारणात येऊ नये. असं राज ठाकरे म्हणाले.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Monday, September 30, 2013, 20:13


comments powered by Disqus