‘जयप्रभा’नं धुडकावले न्यायालयाचे आदेश…, jaiprabha studio ignored court order

‘जयप्रभा’नं धुडकावले न्यायालयाचे आदेश…

‘जयप्रभा’नं धुडकावले न्यायालयाचे आदेश…
www.24taas.com, कोल्हापूर

कोल्हापुरातील जयप्रभा स्टुडिओ पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडलाय. विक्री व्यवहारामुळे वादग्रस्त ठरलेल्या जयप्रभा स्टुडिओचे कामकाज ‘जैसे थे’ ठेवण्याचे कोर्टाचे आदेश धुडकावून लावत रविवारी रात्रीपासून इथं साहित्य हलवण्यास सुरुवात झालीय.

रविवारी रात्रीपासून स्टुडिओमधील साहित्य बाहेर काढण्यास सुरवात करण्यात आलीय तसंच स्टुडिओचे व्यवस्थापक सुभाष पाटील यांच्यासह इतर चार कर्मचाऱ्यांचे राजीनामेही घेण्यात आलेत. यासाठी ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांचे अकाऊंटन्ट वरुण जोशी कोल्हापुरात आले होते. चित्रपटसृष्टीत मोलाचे योगदान ठरलेल्या जयप्रभा स्टुडिओची विक्री करण्याला कोल्हापुरकरांचा विरोध आहे. कोल्हापूरच्या जनतेच्या भावना लक्षात घेऊन ही जागा विकत घेऊ पाहणाऱ्या गुंदेशा बंधूंनी हा व्यवहार रद्द करत असल्याची घोषणा केली होती. तत्पूर्वी, अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्यावतीनं या व्यवहाराविरोधात न्यायालयात धाव घेण्यात आली. तर कोल्हापूर महापालिकेनेही या जागेवर आरक्षण टाकण्याचा ठराव अलीकडेच केला आहे.

काल रात्री स्टुडीओतील साहित्य हलविण्यास सुरवात झालीय, ही बातमी कळताच चित्रपट व्यवसायाशी संबंधित लोकांनी आणि शिवसेनेचे आमदार राजेश क्षिरसागर यांनी स्टुडिओकडे धाव घेतली. स्टुडिओचा वाद कोर्टात आहे, त्यामुळं जर स्टुडीओमधील साहित्य पुन्हा हलविण्याचा प्रयत्न केला तर जशास तस उत्तर देवू असा इशारा क्षीरसागर यांनी दिलाय.

First Published: Monday, October 8, 2012, 12:40


comments powered by Disqus