मल्लांच्या तालमींमध्ये चाकूचे वार! Knife attack in wrestling field

मल्लांच्या तालमींमध्ये चाकूचे वार!

मल्लांच्या तालमींमध्ये चाकूचे वार!
www.24taas.com, कोल्हापूर

राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीचे मल्ल घडवणा-या कोल्हापुरातल्या तालमींमधला जुना वाद आता पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय. तालीम संघाच्या अध्यक्षांवर पैलवानानं चाकू हल्ला केल्यामुळे कुस्तीचे आखाडे राजकारणाचे अड्डे बनलेत का? असा प्रश्न उपस्थित झालाय.

कोल्हापूर म्हणजे कुस्तीची पंढरी... राजर्षी शाहू महाराजांनी मल्लांना राजश्रय देवून अनेक मल्लांना घडवलं. शाहू महाराजांनंतरही कोल्हापूर नगरीनं अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीचे मल्ल तयार केले. मात्र गेल्या काही वर्षांपासून इथल्या तालमींमधला वाद शिगेला पोहोचला आहे. कोल्हापूर जिल्हा राष्ट्रीय तालीम संघावर अनेक वर्षांपासून वर्चस्व असलेल्या बाळ गायकवाड यांच्यावर झालेल्या चाकू हल्ल्यानं हा वाद पुन्हा एकदा चर्चेत आला. मंगळवारी रात्री गायकवाड यांच्यावर चाकूहल्ला झाला. हा हल्ला न्यू मोतीबाग तालमीच्या पैलवानांनीच केल्याचा आरोप गायकवाड यांनी केला आहे. यासंदर्भात दोघांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली.

बाळ गायकवाड हे अनेक वर्षांपासून जिल्हा राष्ट्रीय तालीम संघाचे अध्यक्ष म्हणून काम पाहतात. शासकीय स्पर्धांसाठी मल्ल निवडीचे अधिकारही त्यांच्याकडेच आहेत. त्यामुळे ब-याचदा मोतीबाग तालमीचेच मल्ल मोठ्या स्पर्धांसाठी निवडले जातात अशी भावना न्यू मोतीबाग तालमीच्या मल्लांची आणि वस्तादांची आहे. आणि त्यातूनच हा चाकूहल्ला झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.


यानिमित्तानं तालीम संस्था मल्लांना घडविण्यासाठी आहेत की राजकारणासाठी? असा प्रश्न उपस्थित झालाय. तालीम संस्थांमधल्या या वर्चस्ववादातून अनेक चांगल्या मल्लांना विनाकारण त्रास सहन करावा लागतोय. त्यामुळं इथलं राजकारण आणि वर्चस्ववाद कधी संपणार? असा प्रश्न मल्ल आणि कुस्ती प्रेमी विचारत आहेत.

First Published: Thursday, March 28, 2013, 19:53


comments powered by Disqus