...आणि कोल्हापूरची चित्रनगरी पुन्हा उजळली!, kolhapur film city ready for light, camera, action

...आणि कोल्हापूरची चित्रनगरी पुन्हा उजळली!

...आणि कोल्हापूरची चित्रनगरी पुन्हा उजळली!
www.24taas.com, कोल्हापूर

मराठी चित्रपटसृष्टीचं माहेरघर म्हणून कोल्हापूर ओळखलं जातं. याच नगरीत असणाऱ्या चित्रनगरीला काही वर्षांपुर्वी घरघर लागली होती. पण, आता शासनाच्या पुढाकारानंतर या चित्रनगरीत पुन्हा एकदा लाईट, कॅमेरा, अॅक्शन असे शब्द कानावर पडू लागले आहेत. सरकारकडून ‘चित्रनगरी वाचविण्यासाठी लागेल तितका निधी देण्यात येईल’, असं स्पष्ट करण्यात आलंय.

कोल्हापूर शहरापासून काही अंतरावर जवळजवळ ७७ एकर परिसरात ही चित्रनगरी वसलीय. गेल्या सात वर्षांपासून ही चित्रनगरी बंद होती. म्हणाव्या तशा सोयी-सुविधा इथं उपलब्ध नसल्यानं निर्मात्यांनी चित्रनगरीकडं पाठ फिरवली. त्यामुळं या परीसरात घुमणारे लाईट, कॅमेरा आणि अॅक्शनचे शब्द शांत झाले होते. पण कोल्हापूरकर आणि अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या पाठपुराव्यानंतर शासनानं चित्रनगरी वाचविण्यासाठी मदत केली. त्यामुळं चित्रनगरीत पुन्हा एकदा चित्रीकरण सुरु झालंय.

अभय कांबळी निर्मित-दिग्दर्शित अनंत कन्हेर यांच्या जीवनावर आधारीत ‘१९०९’ या चित्रपटाचं चित्रीकरण सुरु झालंय. चित्रनगरीत चित्रपट निर्मितीला आवश्यक असणाऱ्या सुविधा मिळाल्या तर अन्यत्र शूटिंग करण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचं निर्माते, तंत्रज्ञांचं म्हणणं आहे. त्यामुळे राज्य सरकारची अशीच मदत मिळत राहिली तर चित्रनगरी पुन्हा एकदा ‘फिनीक्स’ पक्षाप्रमाणे उभारी घेईल हे नक्की.

First Published: Thursday, March 28, 2013, 16:19


comments powered by Disqus