Last Updated: Saturday, November 24, 2012, 18:37
www.24taas.com, कोल्हापूर कोल्हापूरच्या करवीर तालुक्यातील पाचगावमध्ये आज सरपंचपदाच्या निवडणुकीवरुन पुन्हा दोन्ही गटात वाद पेटून मोठ्या प्रमाणात दगडफेक करण्यात आलीय. यामध्ये पोलिसांची गाडीही फोडण्यात आलीय.
गृहराज्यमंत्री सतेज पाटील गटाचा सरपंच झाल्यानं संतप्त झालेल्या आमदार महादेवराव महाडिक गटाच्या समर्थकांनी जोरदार दगडफेक केली आणि गोंधळ घातला. या दगडफेकीत नवनिर्वाचित सरपंच राधिका खडके याही जखमी झाल्यात. आज पाचगाव ग्रामपंचायत सरपंच पदासाठी निवडणूक होती. ग्रामपंचायत निवडणुकीत सतेज पाटील गटाने १७ पैकी १० जागा जिंकून बहुमत मिळवले. मात्र, मागासवर्गीय प्रवगातून महादेवरा महाडिक यांचा उमेदवार निवडून आला होता. सरपंच पदही मागासवर्गीय गटासाठी राखीव होते. त्यामुळं महाडिक गटाचा सरपंच पदावर दावा होता. परंतु सतेज पाटील गटाच्या राधिका खडके या खुल्या प्रभागातून निवडून आल्या असल्या तरी मागासवर्गीय असल्यानं बहुमताच्या जोरावर त्या सरपंच झाल्या. यामुळं संतप्त झालेल्या महाडीक गटानं दगडफेक केली. या जमावाला आवरताना पोलिसांच्याही नाकी नऊ आले होते. संतप्त गटानं पोलिसांवरही दगडफेक करायला मागेपुढे पाहिलं नाही.
या दोन गटांतील वैर स्थानिकांसाठी काही नवीन नाही. शुक्रवारीदेखील पाचगावमध्ये महाडिक गटाच्या सरपंचपदाच्या उमेदवाराच्या घरावर हल्ला झाला होता.
First Published: Saturday, November 24, 2012, 18:32