Last Updated: Saturday, December 7, 2013, 13:00
www.24taas.com, नितीन पाटोळे, झी मीडिया, पुणे पुणेकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी.... सोनसाखळी चोरांनी पुण्यात अक्षरशः धुमाकूळ घातलाय. पुण्यात फक्त १७ तासांत सोनसाखळी चोरीच्या तब्बल १४ घटना घडल्यायत. या १४ घटनांमध्ये महिलांच्या गळ्यातील तब्बल अर्धा किलो सोन्यावर डल्ला मारण्यात आलाय.
घटना पहिली… सकाळी ९ वाजून १० मिनिटं कोथरूडमध्ये वृषाली भंडारी पायी जात असताना, दुचाकीवरून आलेल्या दोघांनी साडे चार तोळ्यांचं मंगळसूत्र हिसकावलं.
घटना दुसरी… सकाळी सव्वा नऊ… कोथरूडमध्येच अनुवेदिता बसवा स्कूटर वरून जात असताना, दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांच्या साडे चार तोळ्यांचे मंगळसूत्र चोरलं
घटना तिसरी… सकाळी सकाळी सा़डे दहा....पिंपरीमध्ये मिला वाघोलीकर भाजी मंडईत जात असताना, दुचाकीवरून आलेल्या दोघांनी चार तोळ्यांचं मंगळसूत्र मारलं....
पुढे दिवसभरात अशा एकूण चौदा घटना घडल्या… अवघ्या १७ तासात घडलेल्या सोनसाखळी चोरीच्या या १४ घटनांमध्ये चोरांनी अर्धा किलो सोनं लंपास केलं. विशेष म्हणजे पुण्याच्या सर्वच भागात या घटना घडल्यात. सोनसाखळी चोरांच्या या धुमाकुळामुळे पुणेकर विशेषतः महिला हादरून गेल्या आहेत. सोन्याचे इतर दागिने तर सोडाच, साधं मंगळसूत्रसुद्धा घालायचं की नाही… असा प्रश्न महिला विचारतायत.
पुण्यात वर्षभरात सोनसाखळीच्या घटना प्रचंड वाढल्यायत.
वर्षभरात सोनसाखळी हिसकावाण्याचे ४७६ गुन्हे दाखल झाले. या सगळ्या घटनांमध्ये चोरीला गेलेल्या सोन्याची किंमत तब्बल २ कोटी ६० लाख इतकी आहे. सोनसाखळी हिसाकावाताना एखाद्या महिलेने प्रतिकार केला तर, तिच्यावर धारदार शास्त्रांनी वार करायला हे चोर मागेपुढे पाहत नाहीत. स्कूटर वरून चाललेल्या महिलेच्या गळ्यातून सोनसाखळी हिसाकावाताना अपघातही घडतात. सोनसाखळी चोरीचे हे गुन्हे महिलांच्या जीवाशी खेळणारे ठरतायत. बॉम्बस्फोटातून पुणेकरांना, हल्ल्यातून दाभोलकरांना पोलीस आयुक्त वाचवू शकले नाहीत… आता किमान सोनसाखळी चोरांना लगाम घालण्याचं कर्तुत्व तरी पोळ यांनी दाखवावं, एवढी माफक अपेक्षा आहे.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Saturday, December 7, 2013, 12:59