एटीएम कार्ड नव्हे ही तर लग्नपत्रिका!Life Style - Satara: This is Not ATM card this is marriage invit

एटीएम कार्ड नव्हे ही तर लग्नपत्रिका!

एटीएम कार्ड नव्हे ही तर लग्नपत्रिका!
www.24taas.com, झी मीडिया, कऱ्हाड/सातारा

गुलाबी थंडी... म्हणजे लग्नसमारंभांचा काळ... लग्न म्हटलं की लग्नपत्रिका ही आलीच. मात्र आता काळानुसार या लग्नपत्रिकांचा लुक बदलू लागलाय. तसाच काहीसा प्रकार आपल्याला या फोटोतील पत्रिका पाहून वाटेल. एटीएम कार्ड असाच प्रश्न या पत्रिकेकडे पाहिले की निर्माण होतो.

जीवांच्या आयुष्यभराच्या गाठी बांधणाऱ्या विवाहासाठी निमंत्रण देणारी लग्नपत्रिकाही आता बदलत आहेत. बॅंकांच्या एटीएम कार्डच्या आकाराप्रमाणं हुबेहूब दिसणारी लग्नपत्रिका नुकतीच सातारा शहरात पाहायला मिळाल्यानं पत्रिकेच्या बदलत्या स्वरूपाबाबत कुतूहल होतं.

कऱ्हाड इथं एकाच्या लग्नाची पत्रिका ही बॅंक ऑफ इंडियाचे एटीएम कार्ड तर नाही ना? असाच पाहणाऱ्याला प्रश्नप पडत होता. एटीएम कार्डपेक्षा आकारानं थोडी मोठी मात्र हुबेहूब कार्डप्रमाणं असणारी ही पत्रिका अनेकांच्या कुतूहलाचा विषय ठरली. कार्ड, तसंच ते ठेवणाऱ्या पाकिटावर बॅंकेच्या नावाच्या ठिकाणी त्याच रंगात त्याच आकारात न्यू लाईफ बॅंक असं इंग्रजीत आणि नव- जीवन बॅंक असं मराठीत लिहिलं होतं.

कार्डच्या पुढच्या बाजूला लहान आकारात गणपतीचं चित्र आणि कार्डवर क्रमांक असलेल्या ठिकाणी हळदीचा दिवस आणि लग्नाची तारीख लिहिण्यात आलीय. वैधतेच्या ठिकाणी विवाह मुहूर्ताची वेळ नमूद केली होती. कार्ड धारकांच्या नावाच्या ठिकाणी नवरा आणि नवऱ्या मुलीच्या नावाचा उल्लेख करण्यात आला होता.

एका बाजूला कृपया आहेर आणू नयेत असाही मजूकर होता. कार्डच्या एका बाजूला सुटसुटीतरीत्या असलेला हा मजकूर तर दुसऱ्या बाजूला आपले नम्र, विवाहस्थळ यासह अन्य मजकुराचा उल्लेख करण्यात आला होता. नुकतीच अशी पत्रिका असलेलं लग्न पार पडलं असून, या आगळ्यावेगळ्या पत्रिकेचं कुतूहल आजही पाहायला मिळत आहे.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Sunday, December 22, 2013, 13:05


comments powered by Disqus