अजित पवार यांचा तडकाफडकी संचालक पदाचा राजीनामा , Mahananda director Ajit Pawar`s resignation

अजित पवार यांचा तडकाफडकी संचालक पदाचा राजीनामा

अजित पवार यांचा तडकाफडकी संचालक पदाचा राजीनामा
www.24taas.com, झी मीडिया, पुणे

महाराष्ट्र राज्य सहकारी दुध महासंघ, अर्थात ` महानंद` च्या संचालक पदाचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजीनामा दिला आहे. अजित दादांच्या राजीनाम्याने उलट - सुलट चर्चा सुरु झाली आहे. कामाच्या व्यापामुळे ` महानंद` ला वेळ देता येत नाही. असं कारण अजित दादांनी राजीनामा देताना दिलंय. मात्र खरं कारण वेगळेच असल्याची चर्चा आहे.

महानंदला होणारा तोटा आणि अनियमितता यामुळेच अजित दादांनी राजीनामा दिल्याचं महानंदच्या काही संचालकांच म्हणणं आहे. राज्य सहकारी बँकेच्याच मार्गाने राज्य दुध संघ देखील जाणार का, अशी चर्चा त्यामुळे सुरु आहे.

रोज सव्वा पाच लाख लिटर पिशवी बंद दुधाची विक्री होत असते. पनीर, तूप, श्रीखंड, लस्सी अशी अनेक उत्पादने आहेत. या सर्वांमधून होणारी कोट्यवधीं आर्थिक उलाढाल. या सर्वाबरोबरच राज्यातील सहकारी दुध संघांची शिखर संस्था. आणि हा अवाढव्य व्याप आहे महानंदचा. राजकीय दृष्ट्या महत्वाच्या अशा या महानंदच्या चाव्या राष्ट्रवादीच्या हाती आहेत. मात्र या महानंदमध्ये देखील सारं काही आलबेल असल्याची चर्चा आहे. ही चर्चा सुरु झालीय ती खुद्द अजित पवारांमुळे. कारण अजित पवार यांनी महानंदच्या संचालक पदाचा राजीनामा दिला आहे.

अजित पवार मागील ८ वर्षांपासून महानंदचे संचालक आहेत. मात्र त्यांनी अचानक दिलेल्या राजीनाम्यामुळे महानंदला घरघर तर लागली नाही ना, अशी चर्चा सुरु झालीय. महानंदला वेळ देता येत नाही, असं कारण अजित पवार यांनी राजीनाम्यासाठी दिलंय खरं. मात्र खरं कारण वेगळाच असल्याचं महानंद्च्याच जाणत्या संचालकांच म्हणणं आहे. महानंदला कोट्यवधींचा तोटा झालाय. तसेच कारभारात देखील अनियमितता असल्याची कुजबुज आहे. यामुळेच अजित पवार यांनी `महानंद`ला रामराम ठोकला आहे, असं बोललं जातंय. दरम्यान, पवारांच्या आधी महानंदचा राजीनामा मंत्री सुरेश धस यांनीही दिला आहे.

राज्य सहकारी बँकेच्या बरखास्तीमुळे राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि विशेषतः अजित पवार यांना मोठा धक्का बसला होता. राज्य सहकारी बँक ही राज्यातील सहकारी बँकांची शिखर बँक तर, महानंद राज्यातील सहकारी दुध संघांची शिखर संस्था. राज्य सहकारी बँके खालोखाल सहकारात आणि ग्रामीण राजकारणात महानंदचं महत्व. अशा या महानंदवर अनियमिततेमुळे राज्य सरकारने कारवाईचा बडगा उचलला तर पुन्हा नवे संकट नको, म्हणून पवारांची राजीनामा देऊन बाहेर पडल्याचे बोलले जात आहे.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, December 4, 2013, 18:27


comments powered by Disqus