Last Updated: Friday, December 28, 2012, 15:04
www.24taas.com, पिंपरीरांका ज्वेलर्सने भोसरी येथील दत्ता फुगे यांच्या मागणीनुसार सुमारे एक कोटी २७ लाख रुपये किमतीचा सोन्याचा शर्ट तयार केला आहे. जगातील या सर्वात महाग शर्टची निर्मिती केल्याचा दावा तेजपाल रांका यांनी केला आहे.
साडेतीन किलो सोने , स्वारोसकी क्रीस्टल आणि पांढर्या रंगाचे वेलवेटचे कापड यांचा वापर करून या शर्टची निर्मिती केली आहे. त्याबाबत रांका म्हणाले , पारंपरिक दागिने तयार करणे आणि शर्ट तयार करण्यात फरक आहे. शर्टचे कापड अंगात घातल्यानंतर सुटसुटीत वाटते आणि त्याची घडी पडते. परंतु , सोन्याच्या धातूपासून शर्ट तयार करण्याचे आव्हान होते.
त्यासाठी सोन्याच्या १४ हजार टिकल्या आणि एक लाख छोट्या कडींचा वापर करण्यात आला आहे. त्यासाठी पंधराहून अधिक बंगाली कारागिरांनी दोन आठवडे मेहनत घेतली. ते रोज १६ ते १८ तास काम करीत होते.
ते म्हणाले , या शर्टसाठी तीन हजार २०० ग्रॅम आणि त्याच्या बेल्टकरिता ३२५ ग्रॅम २२ कॅरेटचे सोने वापरण्यात आले. या शर्टची नोंद गिनीज बुक आणि लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे.
First Published: Friday, December 28, 2012, 15:04