Last Updated: Monday, May 6, 2013, 18:30
www.24taas.com, झी मीडिया, कोल्हापूरएकीकडं राज्यात दुष्काळ पडला असताना मात्र दुसरीकडं मनसेचे पदाधिकारी बैलगाडी शर्यत घेण्यात मग्न असल्याचं चित्र कोल्हापूर जिल्ह्यात पहायला मिळत आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राज ठाकरे मनसेच्या पदाधिका-यांना दुष्काळग्रस्तांना सढळ हाताने मदत करा आणि गायी म्हैशींना जपा असं आवाहन करत असतानाही, मनसेचे पदाधिकाऱ्यांनी विना लाठी – काठी भव्य बैलगाडी शर्यतीचं आयोजन करुन लाखो रुपयांचा चुराडा करण्याचं ठरवलंय. कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले इथं आयोजित केलेल्या या स्पर्धेसाठी एक लाख 25 हजार 353 रुपयांचं पहिलं बक्षीस जाहीर करण्यात आलंय. तर उर्वरीत बक्षीसंही लाखो रुपयांची आहे. मनसेचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष अभिजीत साळोखे, हातकणंगले जिल्हाध्यक्ष राजु गोरे आणि दिवाकर पाटील या मनसेच्या पदाधिका-यांनी या स्पर्धा भरविल्यात.
एकीकडे राज ठाकरे चारा छावण्यांचा दौरा करतायत. मात्र कोल्हापुरातले पदाधिका-यांना त्याचा विसर पडलाय की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.
First Published: Monday, May 6, 2013, 18:28