`मद्यराष्ट्रा`ची झिंग, राष्ट्रवादी विरुद्ध `बंग` NCP on Abhay Bang`s Statement

`मद्यराष्ट्रा`ची झिंग, राष्ट्रवादी विरुद्ध `बंग`

`मद्यराष्ट्रा`ची झिंग, राष्ट्रवादी विरुद्ध `बंग`
महाराष्ट्र मद्यराष्ट्र झालंय, ही अभय बंगांची टीका राष्ट्रवादीला चांगलीच झोंबलीय. बंग यांचं विधान हे मानसिक बकालपण असल्याची टीका राष्ट्रवादीनं केलीय. अभय बंगांनी राज्यातल्या मद्याचा मुद्दा उचलल्यानंतर सामाजिक कार्यकर्त्यांनीही राज्याच्या मद्यधोरणावर कडाडून टीका केलीय.

गडचिरोली जिल्ह्यात सर्चच्या माध्यमातून कुपोषणावर काम करणारे सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग यांच्या या टीकेनं नवं वादळ निर्माण झालय. महाराष्ट्र मद्यराष्ट्र झाल्याचं सांगत, त्यांनी यानिमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनाही टार्गेट केलं.. यावर तातडीनं प्रतिक्रिया देत, डॉ. बंग यांचं हे मानसिक बकालपण असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसनं केली.

डॉ. बंग यांच्या सारख्या सामाजिक कार्यकर्त्याने परखड टीका केल्यानंतर, सामाजिक क्षेत्रातूनही यावर प्रतिक्रिया उमटल्या. पवार हे व्यावहारीक राजकारणी असून, ते याकडे व्यावसायिक दृष्टीकोनातून पाहतात, त्यामुळे त्यांच्याकडून दारुबंदीची अपेक्षा करता येणार नाही, अशा प्रतिक्रिया व्यक्त झाल्या.

डॉ. अभय बंग यांच्या टीकेनं दारुबंदीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आलाय. वाईन आणि दारुतून मिळणा-या महसूलामुळे, या व्यवसायाला राज्यात प्रतिष्ठा निर्माण झालीय. त्याचबरोबर धान्यापासून मद्यनिर्मितीचा निर्णय घेण्यात आला. त्याला विरोधही झाला.. या निर्णयाचा फटका ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात बसत असल्याचं सामाजिक क्षेत्रात काम करणा-यांचं मत आहे. त्यामुळं महसूलावर पाणी सोडत गुटखाबंदीचा निर्णय घेणारं महाराष्ट्र सरकार आता मद्यनिर्मितीच्या बाबतीत सामाजिक स्वास्थ्याला प्राधान्य देणार की महसूलाच्या गरजेपोटी सामाजिक कार्यकर्त्यांच्या मागणीकडं दुर्लक्ष करणार, हे पाहावं लागेल.

First Published: Monday, November 5, 2012, 18:14


comments powered by Disqus