Last Updated: Wednesday, April 30, 2014, 21:25
www.24taas.com, झी मीडिया, कोल्हापूर पोलीस ठाण्यातली पोलीस डायरी आता एक मेपासून हद्दपार होणार आहे. कोल्हापूरसह, सांगली, सातारा, सोलापूर ग्रामीण आणि पुणे ग्रामीण तसंच पुण्यात आता ऑनलाईन फिर्याद सुरू होणार आहे. यानंतर एक जूनपासून संपूर्ण राज्यभर हा उपक्रम राबवला जाणार आहे.
गुन्ह्याची नोंद घेणे त्यासाठी कार्बन वापरणे, डी. बी. शाखेत, गोपनीय शाखेत त्याच्या नोंदी करणे, वायरलेसवरील मेसेज लिहून काढणे, अशी कामं पोलिसांना करावी लागत होती. पण त्याला आता पूर्णविराम मिळणार आहे. यापुढे ऑनलाईन फिर्याद नोंदवली जाईल. एक मे पासून याला सुरूवात होणार आहे. त्यामुळे पोलीस निरिक्ष, उपनिरिक्षक हे काम शिकून घेत आहेत, अशी माहिती गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी दिलीय.
सर्व संगणक यंत्रणा मराठीत असून फिर्याद दाखल कशी करायची? याची माहिती ठाण्यातल्या सर्वच कर्मचाऱ्यांना दिली जात आहे. कोणत्याही परिस्थितीत `पेपरलेस स्टेशन` करण्याचा मानस आहे. तो यशस्वी होईल असा विश्वास पोलीस कर्मचाऱ्यांना आहे.
या उपक्रमामुळे अनेक गोष्टी सहज सोप्या होणार आहेत. गुन्हेगारांची माहिती एका क्लिकवर मिळेल. चोरीला गेलेल्या मुद्देमालाचा तपशिल, मोटारींचा तपशील एका क्लिकवर कोणत्याही ठाण्यातून पाहता येईल. पोलीस मुख्यालयात रोज द्यावा लागणारा रिपोर्टही ऑनलाईन देता येईल. पासपोर्ट व्हेरिफिकेशनही एका क्लिकवर होईल. थोडक्यात पोलिसांचं बळ कागदपत्रांच्या जुळवाजुळवीत लावण्यापेक्षा प्रत्यक्ष गुन्हे तपासावर लावता येईल.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा. •
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Wednesday, April 30, 2014, 20:51