`ओशो`ची पुण्यातील ३०० कोटींची मालमत्ता हडप?,Osho`s 300 crore assets captured

`ओशो`ची पुण्यातील ३०० कोटींची मालमत्ता हडप?

`ओशो`ची पुण्यातील ३०० कोटींची मालमत्ता हडप?
www.24taas.com, झी मीडिया, पुणे

पुण्यातील ओशो आश्रमच्या मालकीची तब्बल ३०० कोटींची मालमत्ता ओशो आश्रमच्या विश्वास्तांनीच हडप केल्याचा आरोप ओशोंचा जुन्या अनुयायांनी केलाय. याप्रकरणी धर्मादाय आयुक्तांकडून काहीच कारवाई न झाल्यानं काही शिष्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतलीय.

पुण्यातल्या कोरेगाव पार्कमध्ये ओशो आश्रम आहे. समाधानाच्या तत्वज्ञानाचा वारसा सांगणारा या आश्रमाच्या विश्वस्तांना लोभाचं ग्रहण लागलंय. आश्रमाचे मुख्य विश्वस्त मुकेश सारडा, मायकेल ओब्रायन, जॉन ऍन्ड्र्यू, आणि डार्सी ओब्रायन यांच्यावर आश्रमाची जमीन हडपल्याचा आरोप करण्यात येतोय. ओशोंचे शिष्य योगेश ठक्कर आणि किशोर रावल यांनीच हा आरोप करत उच्च न्यायालयात धाव घेतलीय.

भक्तांना रहाण्यासाठी गेस्ट हाउस आणि मेडीटेशन हॉल बांधण्याच्या नावाखाली ओशो आश्रमाची जागा झेन प्रॉपरटीज या कंपनीला देण्यात आली होती. धक्कादायक बाब म्हणजे ओशो इंटरनॅशनल फाऊंडेशनचे मुख्य विश्वस्त मुकेश सारडा हेच झेन प्रोप्रायटीजचे मुख्य संचालक आहेत.

झेन प्रोप्रायटीजला बांधकाम क्षेत्राचा फारसा अनुभव नसल्यामुळे झेनने ती जागा आणखी एका खासगी कंपनीकडून विकसित करून घेतली. या दोन कंपन्यातल्या करारानुसार विकासक कंपनीला 27000 स्क्वेअर फूट जागा देण्यात आली. तर उरलेली एक लाख 23 हजार स्क्वेअर फूट जागा झेनच्या ताब्यात राहीली.


जागा विकसीत होताना झेन प्रोप्रायटीज प्रायव्हेट लिमिटेडने स्वतःचं नाव बदलून ओशो मल्टीमिडीया प्रायव्हेट लिमिटेड असं केलं. या व्यवहाराचा सर्वाधिक फायदा मुकेश सारडा यांनाच झाला. सारडांच्या मालकीच्या कंपनीकडे असलेल्या जागेची किंमत 184 कोटी रूपये इतकी आहे.

एकीकडे ओशो इंटरनॅशनल फाऊंडेशन ट्रस्टक़डे पैसे नसल्याचा गळा काढून जमिनी खासगी विकासकाच्या घशात घालायच्या. आणि दुसरीकडे आश्रमात राहणा-या ओशो भक्तांकडून जमा होणारे कोट्यवधी रूपये ट्रस्टमध्ये जमा न करता मुकेश सारडांच्या ओशो मल्टीमिडीयाकडे वळवण्याचा उद्योग करायचा. एवढच नव्हे तर ओशो आश्रमातर्फे वितरीत केल्या जाणा-या प्रसार साहित्याचं उत्पन्नही ओशो मल्टीमिडीयाच्या घशात घातल्य़ाचं उघड झालंय. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचं सांगत ट्रस्टींनी बोलायला नकार दिलाय.

ट्रस्टींच्या कारभालाला वाचा फोडणा-या भक्तांना या आश्रमता प्रवेशबंदी करण्याचा फतवा काढण्यात आलाय. एवढंच नव्हे तर ज्यांच्या नावावर कोट्यवधी रुपये जमा करत आहेत त्या ओशोंच्या समाधीचं दर्शन घेण्यासही मनाई केली जात आहे. ओशोंच्या काळात सर्वांसाठी खुला असलेला आश्रम आता विशिष्ट लोकांची जहागिरदारी झालाय. आश्रम पाहायला येणा-यांचीही लूट इथं सर्रास सुरू असल्यामुळं सामान्य जनता आश्रमापासून दुरावलीय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Saturday, August 10, 2013, 13:05


comments powered by Disqus