Last Updated: Wednesday, March 27, 2013, 08:07
www.24taas.com, पुणे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी सध्या प्रकृतीच्या अस्वस्थतेच्या कारणास्तव पुण्यात विश्रांतीसाठी थांबण्याचा निर्णय घेतला होता.
शरद पवार नुकतेच कोल्हापूर दौऱ्यावर होते. मार्केट यार्ड येथील सरपंच महापरिषदेत भाषण सुरू असतानाच त्यांना अस्वस्थ वाटू लागलं. तरीही त्यांनी भाषण पूर्ण केले. त्यानंतर डी. वाय. पाटील रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली. त्यांना विश्रांतीची गरज असल्यानं पुढचे सर्व कार्यक्रम रद्द करून दुपारी ११.४५ च्या सुमारास त्यांना तातडीनं हेलिकॉप्टरमधून पुण्यात हलविण्यात आलं. शरद पवार यांची प्रकृती स्थिर असली तरी त्यांना विश्रांतीची गरज असल्याचं त्यांचे डॉक्टर रवी बापट यांनी म्हटलं.
महत्त्वाची गोष्ट म्हणजे क्रांतीवीर नागनाथ अण्णा यांच्या स्मृतिदिनाच्या कार्यक्रमासाठी शरद पवार, सपाचे नेते मुलायम सिंग आणि मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे एकाच मंचावर दिसणार होते. पण पवार यांच्या प्रकृती अस्वस्थ्यामुळे ते पुण्याला निघून गेले आणि तिन्ही नेत्यांना एकाच मंचावर पाहण्याचा क्षण मात्र हुकला.
First Published: Wednesday, March 27, 2013, 08:07