पंचगंगेमुळे कोल्हापुरकरांचं आरोग्य धोक्यात! Polluted water of Panchganga

पंचगंगेमुळे कोल्हापुरकरांचं आरोग्य धोक्यात!

पंचगंगेमुळे कोल्हापुरकरांचं आरोग्य धोक्यात!
www.24taas.com, झी मीडिया, कोल्हापूर

कोल्हापुरातल्या पंचगंगा नदीच्या प्रदुषणाचा प्रश्न काही मिटताना दिसत नाहीय. शहरातल्या जयंती नाल्याचं पाणी आता थेट पंचगंगा नदीत मिसळतंय. पावसामुळं या नाल्याच्या पाणी पातळीत वाढ झाल्यास मोठ्या प्रमाणात दुषित पाणी पंचगंगा नदीत मिसळेल. त्यामुळं पुन्हा एकदा नदी काठच्या लोकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे.

कोल्हापूर शहरातल्या सर्वात मोठ्या जयंती नाल्याचं पाणी अशाप्रकारे थेट पंचगंगा नदीत मिसळत असल्यामुळं नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय. गेल्या वर्षी कोल्हापूर जिल्ह्यात काविळीच्या साथीमुळं अनेकांना आपला जीव गमवावा लागला होता. मात्र तरीदेखील कोल्हापूर महापालिका किंवा प्रदुषण नियत्रणं मंडळ हे प्रदुषण रोखण्यासाठी प्रयत्न करताना दिसत नाहीत.

कोल्हापूर महापालिकेनं प्रदुषण रोखण्यासाठी 75 कोटींचा प्रकल्प राबवलाय. पण तो प्रकल्प अद्यापही पूर्ण झालेला नाही. याबाबत महापालिका उपायुक्तांना विचारलं असता त्यांनी प्रकल्प अंतिम टप्यात असल्याचं सांगितलं आणि जयंती नाल्यावर उपसा पंप बसवण्यासाठी एक महिन्यापूर्वी प्रदुषण नियत्रंण मंडळाकडं परवानगी मागितली असल्याचं उत्तर दिलं. मात्र याआधी प्रशासन काय करत होतं असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय.

कोल्हापूर शहरात दररोज 76 एमएलडी सांडपाणी तयार होतं. यापैकी केवळ 40 टक्केच पाण्यावर प्रक्रिया होऊन उर्वरित पाणी पंचगंगा नदीला सोडलं जातं. हेच पाणी इचलकरंजी आणि शिरोळ तालुक्यातल्या काही गावांच्या लोकांच्या पिण्यासाठी वापरलं जातं. त्यामुळं इथल्या नागरिकाचं आरोग्य पुन्हा एकदा धोक्यात आलंय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Tuesday, June 4, 2013, 19:48


comments powered by Disqus