पुणेकरांचा मराठी बाणा Pune people want all development plans in Marathi

पुणेकरांचा मराठी बाणा

पुणेकरांचा मराठी बाणा
www.24taas.com, पुणे

पुण्याचा नवीन विकास आराखडा आणि विकास नियमावली नगरसेवकांना मराठीमध्ये हवी आहे. बहुसंख्य नगरसेवकांची ही मागणी प्रशासनाने मान्य केली आहे. त्यामुळे नवीन विकास अराखाड्यावरचा निर्णय एक महिना पुढं गेलाय. विकास आराखड्यावरून सध्या महापालिकेत जोरदार राजकारण सुरु आहे. परिणामी, पुण्याचा नवीन विकास आराखडा रखडण्याची शक्यता आहे.

पुणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत बहुतेक सर्वच पक्षांच्या नगरसेवकांनी मराठीचा आग्रह धरला. त्याचं कारण होतं पुणे शहराच्या जुन्या हद्दीचा नव्याने करण्यात आलेला विकास आराखडा. हा विकास आराखडा प्रशासनाने इंग्रजीत केला आहे. तसंच, विकास नियमावलीदेखील इंग्रजीमध्येच आहे. नगरसेवकांना तो मराठीत हवा आहे. विरोधी पक्षनेते वसंत मोरे यांनी विकास आराखडा आणि विकास नियमावली मराठीत उपलब्ध करून देण्याची मागणी केली. पाठोपाठ भाजपनंही त्यांना पाठींबा दिला.

विकास आराखडा आणि विकास नियमावली मराठीत करण्यासाठी प्रशासनाला वेळ लागणार आहे. त्यामुळे विकास आराखड्याची विशेष सभा आता एक महिन्यानं होणार आहे. उशीर झाला तरी चालेल मात्र विकास आराखडा मराठीत हवा. अशी बहुतेक सर्वच पक्षांच्या नगरसेवकांची मागणी आहे. प्रशासन अर्धवट माहिती मांडत आहे. मराठीत माहिती आल्यानं विकास आराखड्याचे खरे रूप पुढे येईल. अशी अपेक्षा नगरसेवकांना आहे.

पुणे शहराच्या जुन्या हद्दीचा नव्याने तयार करण्यात आलेला विकास अराखडा मागील १५ वर्षांपासून रखडलेला आहे. साहजिकच त्याबाबत मोठी उत्सुकता होती. महापालिकेची सर्वसाधारण सभा देखील खास त्यासाठी बोलवण्यात आली होती. मात्र, मराठीच्या सुचनेवर ही सभा तहकूब झाली. विकास आरखडा महापालिकेने मंजूर करून, त्यावर सूचना आणि हरकती मागविण्याची मुदत मार्चपर्यंत आहे. मात्र, विकास अराखाड्यावरचं राजकारण पाहता हा आराखडा मार्चपर्यंत राज्य सरकारकडे दाखल होण्याची शक्यता कमीच दिसतंय.

First Published: Monday, November 5, 2012, 21:32


comments powered by Disqus