Last Updated: Saturday, June 15, 2013, 16:59
www.24taas.com, झी मीडिया, पुणे
शिक्षणाचं मंदिर म्हणवणाऱ्या शाळा किती मुजोर आहेत. त्याचं धक्कादायक उदाहरण पुण्यात समोर आलंय. शहरी भागातल्या शाळांबरोबरच ग्रामीण भागातल्या शाळाही मुजोर होत चालल्यायत. या शाळांच्या मुजोरीबाबत माध्यमांनी आवाज उठवला तर माध्यमांनाच धमकावण्याचा प्रकार घडलाय.
शाळेच्या गेट बाहेर थांबलेला चिमुकला अविष्कार... अविष्कार याच सेंट जोसेफ शाळेत प्री केजीच्या वर्गात शिकत होता. त्याचे सगळे मित्र शाळेत जातात, पण अविष्कारला मात्र शिक्षा करण्यात आलीय. आपल्याला असं गेटच्या बाहेर का उभं का केलंय? याचं उत्तरही या चिमुकल्याला माहीत नाही, ते कळण्याचं त्याचं वयही नाही. अविष्कारनं फी भरली नाही म्हणून त्याला शाळेबाहेर उभं केल्याचं शाळेचं म्हणणं आहे. पण त्यामागे वेगळीच गोष्ट आहे. मुळात शाळा मनमानी करुन फी आकारतेय. फी संदर्भात ना कुठले नियम पाळले जातात, ना पालकांना विश्वासात घेतलं जातं... त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे शाळेला मान्यता आहे की नाही याबाबतच संशय आहे. हीच माहिती अविष्कारच्या वडिलांनी म्हणजेच दिलीप कामथे यांनी मागितली आणि त्याचीच शिक्षा त्यांचा मुलगा अविष्कार अशा पद्धतीनं भोगतोय.
शाळा माहिती देत नाही म्हटल्यावर कामथे यांनी शिक्षण विभागाकडे दाद मागितली. गटशिक्षण अधिकारी, शिक्षणाधिकारी यांनी शाळेला अनेकदा नोटीसा पाठवल्या. त्याला शाळेनं कचऱ्याची टोपली दाखवली. अखेर गटशिक्षण अधिकाऱ्यांनी शाळेची मान्यता रद्द करण्याचा प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या शिक्षण अधिकाऱ्यांना दिला. या प्रस्तावात गट शिक्षण अधिकाऱ्यांनी म्हटलंय की ‘शाळेच्या मान्यतेसंदर्भातली कागदपत्रं शाळेनं तीनदा मागणी करूनही दिली नाहीत. शाळा आरटीईचे पालन करते की नाही, याचीही कागदपत्रे शाळेनं सादर केली नाहीत. शाळा विद्यार्थ्यांकडून अवास्तव फी आकारात असल्याची शक्यता नाकारता येत नाही’.
हा अहवाल आहे ३१ जानेवारी २०१३ चा… म्हणजे याला सहा महिने उलटले तरीही जिल्हा परिषदेच्या शिक्षण अधिकाऱ्यांनी अजून काहीही कारवाई केलेली नाही. सहा महिने शिक्षण अधिकारी गप्प बसण्यामागे काय गुपित दडलंय, असा प्रश्न नक्कीच पडतो.
झी २४ तासलाही धमकावण्याचा प्रयत्न यासंदर्भात सेंट जोसेफ शाळेची बाजू काय आहे, हे जाणून घेण्यासाठी ‘झी २४ तास’च्या प्रतिनिधींनी शाळेच्या व्यवस्थापनाला फोन केला. त्यावर फादर रिक्स आणि त्याच्या सहकाऱ्यांनी केलेला प्रकार तर आणखीनच धक्कादायक होता. शाळेच्या व्यवस्थापनानं चक्क पोलिसांशी संगनमत केलं आणि पोलिसांकडून `झी २४ तास`च्या प्रतिनिधींना धमकावण्याचा प्रयत्न केला. स्वतःला पीएसआय म्हणवणाऱ्या अनिल भंडारी या व्यक्तीनं `पोलीस स्टेशनला या, तुमच्याकडे बघतो`. अशी धमकीच दिली. सेंट जोसेफ या खाजगी शाळेच्या खास दिमतीला असलेल्या पोलिसांची ही तत्परता चक्रावून टाकणारी होती.
आता तरी शिक्षण विभाग या मुजोर शाळेवर कारवाई करणार का? की फक्त बघ्याची भूमिका घेणार? शिक्षण विभागाला याचं उत्तर द्यावंच लागेल.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Saturday, June 15, 2013, 16:58