Last Updated: Monday, July 22, 2013, 09:40
www.24taas.com, झी मीडिया, सांगली ‘डान्स बारबंदीबाबतचा कायदा कमकुवत कारायचा सरकारचा हेतू असता, तर राज्यात साडे सात वर्ष डान्सबार बंदी लागू झालीच नसती’, अशा शब्दांत गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरें यांना टोला लगावलाय.
शनिवारी पत्रकारांशी बोलताना डान्सबार बंदी प्रकरण म्हणजे सरकारचं केवळ ढोंग असल्याचं सांगत राज ठाकरेंनी ‘डान्सबार बंदीची सरकारची इच्छाच नाही. आता निवडणुका जवळ आल्यात, त्यामुळे हे प्रकरण पुढे आलंय. त्यांना पैसा कमी पडत असेल, म्हणून हे प्रकरण पुढे आलंय’ अशी बोचकी प्रतिक्रिया दिली होती. त्यावर आबांनी राज ठाकरेंना डान्सबार बंदी बाबतचा सरकारचा हेतू शुद्ध असल्याचं प्रत्यूत्तर दिलंय. ‘राज्यातील डान्स बार बंदीबाबत सर्वानुमते विधिमंडळात निर्णय घेतला होता. यावेळी विधी व न्याय विभागाचाही सल्ला घेतला गेला. या कायद्यात त्रुटी राहिल्या असत्या, तर साडेसात वर्षे डान्स बार बंद राहिले नसते’ असं आबांनी यावेळी म्हटलं. ते सांगलीमध्ये जिल्हा दौऱ्यावर आले असताना पत्रकारांशी बोलत होते.
सर्वोच्च न्यायालयातही शासनाची बाजू खंबीरपणो मांडली गेली आहे, असंही त्यांनी यावेळी म्हटलंय. राज्यात २००६ मध्ये राज्य सरकारने मुंबईसह राज्यातील डान्सबारवर बंदी घातली होती. पण, ही बंदी सर्वोच्च न्यायालयानं अयोग्य असल्याचं सांगत डान्सबारला राज्यात पुन्हा परवानगी दिलीय. यानिर्णयाविरोधात राज्य सरकार फेरयाचिका दाखल करण्याच्या तयारीत असल्याचं याआधीच आर. आर. पाटील यांनी स्पष्ट केलंय.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Monday, July 22, 2013, 09:40