Last Updated: Sunday, October 21, 2012, 12:09
www.24taas.com,पुणेपुण्याच्या पालकमंत्रीपदी राज्याचे गृहनिर्माण राज्यमंत्री सचिन अहिर यांच्या नावावर शिकामोर्तब केले आहे. त्यामुळे अहिर हे आता पुण्याचे पालकमंत्री म्हणून काम पाहणार आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यस्तरीय अधिवेशन पुण्यात सुरू असताना अहिर यांच्या गळ्यात पुण्याच्या पालकमंत्रीपदाची माळ घालण्यात आली आहे. अहिर यांच्या निवडीमुळे राष्ट्रवादीतील काही इच्छुक मात्र दुखावले गेले आहेत. सिंचन घोटाळ्यातील आरोपामुळे तडकाफडकी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. राजीनाम्यानंतर त्यांचे पुण्याचे पालकमंत्रिपदही गेले होते.
पालकमंत्री पदासाठी अजितदादांचे निकटवर्ती मंत्री राजेश टोपे , सुनील तटकरे यांची नावे चर्चेत होती. याशिवाय कृष्णा खोरे उपाध्यक्ष आणि जुन्नरचे आमदार वल्लभ बेनके , आमदार लक्ष्मण जगताप , विलास लांडे यांनी मंत्रिपदासाठी बाशिंग बांधले होते. परंतु राष्ट्रवादीच्या वरिष्ठांनी अहिर यांच्या नावाला हिरवा कंदील दाखविला.
अहिर यांच्याकडे मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्षपद होते. परंतु त्यांचे हे पद काढून घेण्यात आले होते. हे पद काढण्यामागे अजितदादा असल्याची चर्चा होती. अहिर यांचे शरद पवार यांच्याशी असलेले घनिष्ट संबंध यामुळे अहिर यांना हि लॉटरी लागल्याचे बोलले जात आहे.
पालकमंत्रीपदी अहिर यांचे नाव सुचविल्यागेल्यानंतर ते म्हणाले, स्थानिक पातळीवर सर्वच राजकीय पक्षाचे नेते आणि पुणेकरांना विश्वासात घेऊनच पुढील काळात पावले टाकली जातील. पुण्याच्या समस्यांचा अभ्यास केला जाईल आणि तसे काम करू.
First Published: Sunday, October 21, 2012, 12:01