शालिनी पॅलेस जप्त; शाहूप्रेमी अस्वस्थ, saraswat bank & shalini palace

कोल्हापूरचा शालिनी पॅलेस जप्त; शाहूप्रेमी अस्वस्थ

कोल्हापूरचा शालिनी पॅलेस जप्त; शाहूप्रेमी अस्वस्थ
www.24taas.com, कोल्हापूर

राजर्षी महाराजांची आठवण आणि कोल्हापूरची शान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘शालिनी पॅलेस’वर सारस्वत बँकेनं गुरुवारी रात्री उशीरा जप्तीची कारवाई केलीय. त्यामुळे कोल्हापूरकरांनी तीव्र संताप व्यक्त केलाय.

रंकाळा तलावाचा साथीदार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘शालिनी पॅलेस’च्या व्यवस्थापनाविरुद्ध सारस्वत बँकेच्या मुंबई शाखेनं ही कारवाई केलीय. शालिनी पॅलेसवर सारस्वत बँकेच्या मुंबई शाखेचे सुमारे ३२ कोटींचे कर्ज आहे. तर युको बँकेचे सुमारे १८ कोटीं कर्ज आहे.

‘शालिनी पॅलेस’ या ऐतिहासिक वास्तूचा ताबा शासनाने घेऊन ही वास्तू जतन करावी, अशी कोल्हापूरच्या जनतेची मागणी लक्षात घेऊन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हा ऐतिहासिक ठेवा जपण्यासाठी शासन प्रयत्न करील असं आश्वासन दिलं होतं.

या आधी उद्योगपती शामराव चौगुले यांचा शालिनी पॅलेसवर ताबा होता. 2011 साली या पॅलेसचा लिलाव करण्यासाठी सारस्वत बँकेनं वृत्तपत्रांमध्ये जाहिरात दिली आणि शालिनी पॅलेस विकणे आहे या जाहिरातीनं खळबळ उडाली होती. तर सहा महिन्यापूर्वी बँकेने कारवाईची नोटीस दिल्यावर उलटसुलट बातम्यांना उधाण आलं होतं. तेव्हाच बँकेनं कारवाईची भूमिका घेतली होती पण सरकार आणि सामान्यांच्या भावना लक्षात घेऊन तेव्हा आपला इरादा बँकेला पुढे ढकलावा लागला होता. अखेर कर्जवसुलीसाठी सारस्वत बँकेनं गुरुवारी ही वास्तू आपल्या ताब्यात घेतलीय. खबरदारी म्हणून बँकेने या कारवाईबाबत कमालीची गुप्तता पाळली होती. या पॅलेसचं पुढे काय करायचं, याचा निर्णय मात्र अजूनही बँकेनं घेतलेला नाही. येत्या आठ दिवसांत बँकेकडून याबाबात खुलासा येण्याची शक्यता आहे.

First Published: Friday, December 14, 2012, 18:01


comments powered by Disqus