दहशतवाद्यांना `ट्रेन` करतेय एक महिला!, security in search of lady terrorist

दहशतवाद्यांना `ट्रेनिंग` देतेय एक महिला!

दहशतवाद्यांना `ट्रेनिंग` देतेय एक महिला!
www.24taas.com, पुणे

पुण्यातील येरवडा कारागृहात झालेल्या कातील सिद्दीकीच्या हत्येचा बदला घेण्यासाठी दहशतवादी संघटनांचा प्रयत्न जोरात सुरू असल्याची माहिती मिळतेय. यासाठीच ‘इंडियन मुजाहिद्दीन’ आणि ‘लष्कर ए तय्यबा’ या संघटनांनी नवीन तरुणांना ट्रेन करण्यासाठी एका महिलेची नेमणूक केलीय.

पुणे आणि मराठवाड्यातील तरुणांना दहशतवादी कृत्यांसाठी ट्रेन करण्याची जबाबदारी या महिलेकडे देण्यात आली आहे. या महिलेचं नाव शाहीन असल्याचं गुप्तचर यंत्रणांच्यासमोर आलंय. दहशतवादी कृत्यं आणि जिहाद यांचं महत्त्व ही महिला नवीन तरुणांना समजावून देतेय. पुणे पोलीस आणि गुप्तचर यंत्रणांनी या महिलेचा तातडीनं शोध सुरू केलाय. शाहीन हे तिचं तात्पुरतं नाव आहे. ती सतत नावं बदलत असल्यानं या महिलेला शोधून काढणं पोलिसांसाठी आव्हान ठरतंय.

काही दिवसांपूर्वी पुण्यातील येरवडा तुरुंगात इंडियन मुजाहिद्दीन या संघटनेसाठी काम करणाऱ्या कातील सिद्दीकी या दहशतवाद्याची तुरुंगातच हत्या झाली होती. त्यानंतरच काही दिवसांनी पुण्यात जंगले महाराज रोडवर साखळी स्फोट घडवून आणले गेले. मुंबई हल्ल्यातील एकमेव जिवंत सापडलेला मुख्य आरोपी अजमल कसाब याला पुण्यातील याच कारागृहात फाशी दिली गेलीय. त्यानंतर दहशतवाद्यांची नजर पुण्यावर स्थिरावल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळालीय.


First Published: Wednesday, December 5, 2012, 14:02


comments powered by Disqus