पुणे मॅरेथॉन ट्रस्ट हिशोब द्या हिशोब.... - Marathi News 24taas.com

पुणे मॅरेथॉन ट्रस्ट हिशोब द्या हिशोब....

झी २४ तास वेब टीम, पुणे
 
पुणे मॅरेथॉनसाठी महापालिकेकडून देण्यात येणाऱ्या निधीचा मुद्दा पुन्हा गाजण्याची चिन्हं आहेत. यंदाच्या मॅरेथॉनसाठी पुणे महापालिकेनं २५ लाखांचा निधी जाहीर केला. पण जोपर्यंत मॅरेथॉन ट्रस्ट खर्चाचा हिशोब देत नाही, तोपर्यंत निधी देऊ नये, अशी मागणी सजग नागरिक मंचानं केली.
 
सुरेश कलमाडी यांच्या अटकेनंतर पुणे मॅरेथॉन होईल का, अशी शंका असतानाच मॅरेथॉन ट्रस्टनं स्पर्धेचं आयोजन केलं.  पण स्पर्धेपूर्वीच वाद सुरू झाले. या स्पर्धेला पुणे महापालिका अनेक वर्षं मदत करते. यंदाही या स्पर्धांसाठी महापालिकेनं २५ लाखांचा निधी दिला. पण स्पर्धेचं आयोजन करणाऱ्या मॅरेथॉन ट्रस्टनं पैशांचा हिशोब दिलेला नाही. त्यामुळे जोपर्यंत हिशोब मिळत नाही, तोपर्यंत स्थायी समितीनं स्पर्धेसाठी निधी देऊ नये, अशी मागणी सजग नागरिक मंचानं केली.
 
पुणे मॅरेथॉन ही पुण्याची ओळख बनली. पण कलमाडींनी केलेल्या कॉमनवेल्थ घोटाळ्यानंतर आता मॅरेथॉन ट्रस्टकडूनही हिशोब दिला जात नाही. त्यामुळे हा मुद्दा गाजण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

First Published: Wednesday, November 30, 2011, 15:22


comments powered by Disqus