होय, मी गोळीबार केला - संदीप कर्णिक - Marathi News 24taas.com

होय, मी गोळीबार केला - संदीप कर्णिक

www.24taas.com, पुणे
 
राज्यात खळबळ उडवून देणा-या मावळ गोळीबार प्रकरणी संदीप कर्णिक यांनी चौकशी आयोगासमोर धक्कादायक साक्ष दिली आहे. मावळमध्ये गोळीबाराचे आदेश मी पोलिसांना दिले नव्हते, तर पोलीस अधिका-यांनीच  परिस्थितीनुसार गोळीबाराचा निर्णय घेतला, अशी धक्कादायक  माहिती संदीप कर्णिक यांनी दिली आहे. दरम्यान, होय, मी गोळीबार केला, असे कर्णिक  यांनी सागितले.
 
कर्णिक यांनी आपण गोळीबार करण्यास सांगितले नव्हते. त्याचवेळी आंदोलकांवर स्वतः गोळीबार केल्यांचंही कर्णिकांनी मान्य केलंय. पण त्यावेळी संदीप कर्णिकांकडे त्यांचं रिव्हॉल्वर नव्हतं. त्यांनी दुसऱ्या पोलीस अधिका-यांच्या रिव्हॉल्वरमधून गोळीबार केल्याचं कर्णिकांनी आयोगासमोर सांगितले आहे.
 
मावळ गोळीबार प्रकरणी संदीप कर्णिक यांची चौकशी आयोगासमोर साक्ष आणि उलटतपासणी झाली. या साक्षीमध्ये अतिशय महत्त्वाच्या बाबी समोर आल्या आहेत. आंदोलन पूर्वनियोजित असतानाही पोलिसांचा या आंदोलनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन अजिबात गंभीर नव्हता, असं यामधून पुढे आलं आहे. आंदोलन होणार हे माहीत असतानाही, वाहतुकीसाठी कुठलीही पर्यायी व्यवस्था करण्यात आली नव्हती.
 
त्याचबरोबर आंदोलना दरम्यान शेतकऱ्यांनी जी जाळपोळ केली, त्याचा उल्लेख सरकारला पाठवलेल्या रिपोर्टमध्ये नाही. पोलिसांनी गोळीबार करण्यापूर्वी शेतकऱ्यांना गोळीबार किंवा लाठीचार्जचा इशारा दिला होता का, याचाही उल्लेख सरकारला सादर केलेल्या रिपोर्टमध्ये नाही. या महत्त्वाच्या गोष्टी संदीप कर्णिक यांच्या साक्षीदरम्यान पुढे आल्या आहेत.
 
मावळ गोळीबार प्रकरणी राज्य सरकारनं चौकशी आयोग स्थापन केला आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर मावळ तालुक्यात बोऊरमध्ये ९ ऑगस्ट २०११ रोजी गोळीबार झाला होता. आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर पोलिसांनी गोळीबार केला होता. त्यात तीन शेतकरी ठार झाले होते. त्यावेळी संदीप कर्णिक पुणे ग्रामीण पोलीस दलाचे अधीक्षक होते.

First Published: Thursday, May 17, 2012, 10:34


comments powered by Disqus