पुण्यातील बीआरटी प्रकल्प सपशेल अपयशी - Marathi News 24taas.com

पुण्यातील बीआरटी प्रकल्प सपशेल अपयशी

झी २४ तास वेब टीम, पुणे
 
पुण्यातील बीआरटी प्रकल्प सपशेल अपयशी ठरलाय. कात्रज- स्वारगेट- हडपसर मार्गावर सुरु करण्यात आलेल्या या पायलट प्रोजेक्टमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा संशय राज्य सरकारच्या अंदाज समितीच्या व्यक्त केलाय. सरकारनं बीआरटीवर अपयशचा शिक्का मारल्यानं प्रकल्पाचं भवितव्य धोक्यात आलंय.
 
मोठा गाजावाजा करुन प्रायोगिक तत्वावर पुण्यात सुरु केलेला बीआरटी म्हणजेच बस रॅपिड ट्रान्झिस्ट प्रकल्प अपयशी ठरलाय. राज्य सरकारच्या अंदाज समितीनं बीआरटीवर अपयशाचा शिक्का मारलाय. ६२ कोटी रुपये खर्चून कात्रज- स्वारगेट- ह़डपसर बीआरटी पायलट प्रोजेक्ट तयार करण्यात आला होता. विधिमंडळाच्या अर्थ विभागानं तयार केलेल्या अहवालात बीआरटीवर गंभीर ताशेरे मारण्यात आलेत.
 
बीआरटीचे सोईच्या ठिकाणी बसस्टॉप नाहीत. सिग्नल यंत्रणा सदोष आहे. बीआरटीच्या मार्गावर खड्डे असून स्टॉपवरील फरशा तुटल्या आहेत. मुख्य म्हणजे बीआरटी प्रकल्पाचा प्रवाशांना विशेष फायदा झाला नसल्याचं निरीक्षण नोंदवण्यात आलंय.
या प्रकल्पात मोठा भ्रष्टाचार झाल्याचं संशयही व्यक्त करण्यात आलाय. माहितीच्या अधिकारात मिळवलेल्या माहितीतून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे.  गेल्या महापालिका निवडणुकीच्या तोंडावर बीआरटीच्य़ा माध्यमातून पुणेकरांना वाहतूक सुसुत्रिकरणाचं दिवास्वप्नं दाखवण्यात आली होती. मात्र ही स्वप्नंच आता बेगडी निघाली आहेत.

First Published: Saturday, December 3, 2011, 17:58


comments powered by Disqus