Last Updated: Monday, May 28, 2012, 22:37
www.24taas.com, पुणे पुणेकरांवर आता रिक्षा दरवाढीचं संकट कोसळण्याची चिन्हं आहेत. पेट्रोल दरवाढ मागे घ्यावी, या मागणीसाठी मंगळवारी पुण्यातले रिक्षाचालक जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार आहेत. दरवाढ मागे घेतली नाही, तर रिक्षा भाडेवाढ करण्याचा इशारा रिक्षाचालकांनी दिलाय.
पेट्रोलमध्ये साडे सात रुपयांची वाढ होताच, रिक्षाचालक भाडेवाढीच्या तयारीत आहेत. केंद्र सरकारनं ही दरवाढ मागे घेतली नाही, तर रिक्षा भाडे वाढीशिवाय पर्याय नाही, असा इशारा पुण्यातल्या रिक्षाचालकांनी दिलाय. किमान तीन रुपयांनी दरवाढ करणार असल्याचं रिक्षा संघटनेचे प्रमुख बाबा आढाव यांनी म्हटलंय. दुसरीकडं याबाबत योग्य तो तोडगा काढावा, अशी परिवहन प्राधिकरणाची भूमिका आहे.
सध्या भाडेवाढीचा निर्णय हा हकीम समितीच्या अहवालावर घेतला जाणार आहे. पेट्रोल दरवाढ एवढ्या मोठ्या प्रामाणात झाल्यामुळं रिक्षाचालकांनी लगेचच भाडेवाढीची भाषा केलीय. पण सगळ्याच बाजूंनी पिचल्या जाणाऱ्या जनतेचं काय? हा प्रश्न अनुत्तरीतच आहे.
First Published: Monday, May 28, 2012, 22:37