Last Updated: Wednesday, May 30, 2012, 23:03
www.24taas.com, कोल्हापूर राज्यात मागील पंधरा दिवसात मोठ्या प्रमाणात आंब्याची आवक झालीय. मात्र हापूसलाच खवय्यांची अधिक पसंती आहे. पण त्यासाठी पैसेही जास्त मोजावे लागतात. काही व्यापारी नफ्यासाठी पेटीमध्ये वर हापूस ठेवतात, तर खाली कर्नाटक आणि गोव्यातील आंबा ठेवला जातो. त्यामुळे ग्राहकांनी सावधपणे खरेदी करणं गरजेचं आहे.
फळांचा राजा आंबा बाजारपेठेत दाखल झालाय. मात्र यातही हापूसचं स्थान हे सर्वात उंच आहे. हापूसचा भावही 800 ते 1200 रूपये इतका आहे. तर कर्नाटकी हापूस 400 ते 600 रूपयांना मिळतो. दोन्ही आंब्यांमध्ये फारसा फरक नसल्यानं पेटीत वरती हापूस आणि खाली कर्नाटकी हापूस आणि मालगोवा आंबा ठेवून ग्राहकांची फसवणूक केली जातेय.
फसवणूक टाळण्यासाठी हापूस कसा ओळखायचा याचंही तंत्र आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरीतल्या हापूसचा रंग गर्द पिवळा, चव मधूर, आकार मोठा आणि गर मऊ असतो. तर कर्नाटकी हापूसचा रंग पिवळसर लाल, चव पानचट, आकार लहान असतो, तर गराला दोरा सुटतो. मालगोवा आंब्याचा रंग पिवळा, काळे ठिपके, चव साखरेसारखी आणि आकार लांबट असतो. याच्या गरालाही दोरा सुटतो. या बाबी लक्षात ठेवल्या तर ग्राहकांची फसवणूक होणार नाही.
आंब्याची आवक मागील वर्षीच्या तुलनेत कमी झालेली आहे. त्यामुळे विक्रेत्यांकडून फसवणूक होण्याची शक्यता वाढलीय. परिणामी ग्राहकांनी जागरूकपणे खरेदी केल्यास फसवणूक टाळता येईल.
First Published: Wednesday, May 30, 2012, 23:03