पालिकेच्या शाळा का पडतायेत बंद? - Marathi News 24taas.com

पालिकेच्या शाळा का पडतायेत बंद?

 www.24taas.com, कोल्हापूर
 
कोल्हापूर महानगरपालिकेच्या तब्बल १० शाळा बंद करण्याची वेळ महापालिकेवर आली आहे. विद्यार्थी येत नसल्याची खंत एकीकडे पालिका अधिकारी व्यक्त करत आहेत. तर दुसरीकडे वर्ष उलटलं तरी विद्यार्थ्याना साधे गणवेशही मिळाले नाहीत. त्यामुळे यंदा तरी गणवेश वेळेवर मिळणार का, असा प्रश्न विचारला जातो आहे. कोल्हापूरमध्ये महानगरपालिकेच्या ६३ शाळा आहेत.
 
मात्र, मुलांची संख्या कमी झाल्यामुळं यावर्षी १० शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आूहे. दुसऱ्या बाजूला महापालिकांच्या शाळांमध्ये मुलांची संख्या वाढवण्यासाठी शिक्षकांचे प्रयत्न सुरू आहेत. पालकांचा महापालिकेच्या शाळांकडे पाहण्याचा दृष्टीकोन गेल्या काही वर्षांमध्ये बदलला. त्यामुळे मुलांना शाळेत आणण्यासाठी शिक्षकांना बरीच कसरत करावी लागते आहे. मध्यान्ह भोजनासोबतच मोफत गणवेश देऊ, मोफत पुस्तकं देऊ अशी आश्वासन देत विद्यार्थ्यांना शाळेकडे वळवण्याचा आटोकाट प्रयत्न महानगरपालिकेकडून सुरू आहे.
 
वेगवेगळी प्रलोभने दाखवून विद्यार्थ्यांना शिक्षक शाळेतही आणतील. मात्र, मुलांच्या भवितव्याच्या, गुणवत्तेच्या दृष्टीने ज्या सोयी-सुविधा आवश्यक आहेत, त्याचं काय ? यंदाही विद्यार्थ्यांना गणवेश देण्याचं आश्वासन देण्यात आलं आहे. गेल्या वर्षीचे गणवेश मुलांना अजूनही मिळालेले नाहीत. मुलांची गुणवत्ता कशी वाढेल, याबाबत महापालिकेच्या शाळांनी काळजीपूर्वक लक्ष दिल्यास, पालकांचाही दृष्टीकोन बदलण्यास वेळ लागणार नाही, हेही तितकंच खरं.
 
 
 

First Published: Sunday, June 3, 2012, 18:57


comments powered by Disqus