सांस्कृतिक भवन की भूत बंगला? - Marathi News 24taas.com

सांस्कृतिक भवन की भूत बंगला?

 www.24taas.com, पुणे 
 
सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यात नाट्यगृह आणि कलादालनांची झालेली दूरवस्था कोणत्याही कलाप्रेमी व्यक्तीला हळहळ व्यक्त करायला भाग पाडेल, अशीच झालीय. पुण्याच्या घोले रोडवर भव्य सांस्कृतिक भवन गेली १० वर्षे बांधून तयार आहे. मात्र, प्रशासकीय उदासीनतेमुळे त्याचा वापरच झाला नाहीय. त्यामुळे हे सांस्कृतिक भवन आहे की भूत बंगला असा प्रश्न अनेकांना पडतोय.
 
सांस्कृतिक भवन म्हणून बांधण्यात आलेल्या इमारतीची अक्षरश: रया गेलीय. दर्शनी भागावरुन फुटलेली काच हिमनगाचं टोक आहे. जरा आत डोकावून बघितलं तर परिस्थिती किती भयाण आहे याची कल्पना येते. भिंतींना जळमटं चिकटलेली आहेत. लायटिंग आणि वायरिंगचं काम अजूनही बाकी आहे. वाळू-मातीचे ढीग पडून आहेत. एखादी अंधार कोठडी किंवा बंद पडलेला कारखाना भासावा, अशी या नाट्यगृहाची अवस्था आहे. ही स्थिती गेल्या १० वर्षांपासून ‘जैसे थे’ आहे.
 
परफॉर्मिंग आर्ट्ससाठी १ छोटं नाट्यगृह आणि नॉन-परफॉर्मिंग आर्ट्ससाठी ३ कलादालनं, अशा स्वरुपात हे सांस्कृतिक भवन बांधण्यात आलंय. मात्र कलादालनासाठीच्या २ हॉल्सवर महापालिकेन अतिक्रमण केल्याचा आरोप होतोय. यासंदर्भात कित्येकदा पाठपुरावा करूनही काहीच उपयोग होत नसल्यची कलावंतांची खंत संवाद प्रतिष्ठानचे सुनील महाजन यांनी व्यक्त केलीय. बालगंधर्व रंगमंदिरातलं कलादालनही दुरुस्तीच्या कामासाठी बंद आहे, अशा परिस्थितीत कलावंतानी त्यांच्या कला कुठे सादर करायच्या असा प्रश्न विचारला जातोय. याच कारणासाठी शहरातल्या मान्यवर कलावंतानी घंटानाद आंदोलनही केलं. मात्र, या घंटेचा नाद संबंधितांच्या कानावर पोचला तरच उपयोग होणार आहे.
 
.

First Published: Wednesday, June 6, 2012, 18:32


comments powered by Disqus