Last Updated: Tuesday, June 12, 2012, 08:20
कैलाश पुरी, www.24taas.com, देहू पंढरीची वारी पंढरपूरपर्यंत पोहोचेपर्यंत अनेक गावांना काहीतरी देऊन जाते, काहीतरी शिकवून जाते. देहूतून निघालेले तुकोबा दरवर्षी अनगडशहा बाबांच्या दर्ग्यावर पहिला विसावा घेतात आणि वारी हा फक्त धार्मिक सोहळा न राहता, ऐक्याचा सोहळा होऊन जातो.
पंढरीकडे जाणारे रस्ते टाळ मृदुंगाच्या नादानं भरुन गेलेत. तुकोबांच्या पालखीचं प्रस्थान झाल्यानंतर पालखीचा पहिला मुक्काम अनगडशहा बाबांच्या दर्ग्यामध्ये झाला. अनगडशहा हे तुकोबांचे शिष्य समजले जातात. त्यांच्याच दर्ग्यामध्ये तुकोबा पंढरपूरला निघाल्यावर पहिला विसावा घेतात. गेल्या साडे तीनशे वर्षांपासून ही परंपरा आजही कायम आहे. या दर्ग्यामध्ये पालखीचा मुक्काम असताना अनेक मुस्लीम बांधवही पालखीचं दर्शन घेतात.
विठ्ठलाच्या भक्तीमध्ये धर्म, जाती याची बंधनं गळून पडतात. आणि उरतो तो फक्त भक्तीचा सोहळा. तुकाराम महाराजांचा अनगड वालीशाच्या दर्ग्यावरचा तुकोबांचा मुक्काम याचंच प्रतीक मानलं जातं. पंढरीची वारी म्हणजे धार्मिक सोहळा. पण धार्मिक आणि नैतिक अधिष्ठानाबरोबर महाराष्ट्रावर एकात्मतेचा संस्कार वारी कुठलाही गाजावाजा न करता करुन जाते.
First Published: Tuesday, June 12, 2012, 08:20