शक्कल स्पोर्टस् लायब्ररीची... - Marathi News 24taas.com

शक्कल स्पोर्टस् लायब्ररीची...

www.24taas.com, पुणे
 
पुण्यातील गणेश मंडळं धार्मिक कामाबरोबरच राजकीय आणि सामाजिक कामात देखील नेहमीच अग्रेसर असतात. धनकवडीतील आदर्श मंडळाने देखील सामाजिक कार्याचा अनोखा उपक्रम राबवलाय. हा उपक्रम आहे, नवी पिढी घडवण्याचा... स्पोर्ट्स लायब्ररीचा.
 
सुट्टीत किंवा अगदी रविवारच्या दिवशी बच्चे कंपनी त्यांचा आवडता खेळ खेळू शकणार आहेत कारण क्रीडा साहित्याच्या अभावाची त्यांची अडचण दूर केलीय ती पुण्यातल्या धनकवडीतल्या आदर्श मित्र मंडळानं... आदर्श मित्र मंडळानं या मुलांसाठी स्पोर्ट्स लायब्ररी सुरु केलीय. इथं मुलांना क्रिकेट, बॅडमिंटन, चेस, हॉकी ते अगदी बॉक्सिंग स्केटिंग पर्यंत सर्व खेळांचं साहित्य उपलब्ध करून देण्यात आलंय. मुलांनी शुक्रवारी त्यांच्या आवडीचे किंवा त्यांना हवे ते साहित्य घेऊन जायचे आणि रविवारी संध्याकाळी परत आणून द्यायचे. अशी ही साधी-सोपी पद्धत आणि यासाठी फी आहे फक्त एक रुपया.
 
अनेक खेळांसाठी लागणारं साहित्य महाग असल्यानं मनात असूनही मुलांना या खेळांपासून दूर रहावं लागतं. आणि त्यातूनच पुढे आली स्पोर्ट्स लायब्ररीचा कल्पना... असं आदर्श मित्र मंडळाचे अध्यक्ष उदय जगताप सांगतात. यासारखेच अनेक सामाजिक उपक्रम या मंडळानं राबवलेत, त्यात आता या स्पोर्ट्स लायब्ररीसारखी संकल्पनाही लोकाच्या कौतुकास पात्र ठरतेय.
 
व्हिडिओ पाहण्यासाठी:

.

First Published: Wednesday, June 20, 2012, 09:48


comments powered by Disqus