Last Updated: Sunday, June 24, 2012, 14:55
www.24taas.com, सातारा संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीनं फलटणहून विडणी, पिंपरद, निंबळक फाट्यावरून प्रवास करत काल बरडला मुक्काम केला होता. आज माउलींची पालखी सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करत आहे. पालखीचा आजचा मुक्काम नातेपुते इथं असणार आहे.
संत तुकाराम महाराजांच्या पालखीन निमगाव केतकी, तरंगवाडी कॅनोल, गोकुळीचा ओढा अशा मार्गानं प्रवास करत काल इंदापुरात मुक्काम केला होता. इंदापुरहून मार्गस्थ होत तुकोबांची पालखी आज सरातीला मुक्काम करणार आहे. तर दुसरीकडं संत निवृत्तीनाथांच्या पालखीनं काल सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केलाय.
वारीतले खेळ म्हणजे वारक-यांसाठी आनंदाची पर्वणी असते. त्यात रिंगण सोहळा म्हणजे वारक-यांसाठी आनंद द्विगुणित करणारा क्षण....इंदापूरच्या रिंगण सोहळ्यानंतरही वारक-यांनी विविध खेळ खेळून आपला आनंद व्यक्त केला. पावलीच्या खेळासोबत वारकरी बेधुंदपणे नाचलेसुद्धा...यावेळी फुगड्या घालूनही महिलांनी भक्तीचा सूर आळवला.
वारीचा प्रवास अधिक सुखकर व्हावा, प्रवासातला शीण जावा यासाठी हे खेळ खेळले जातात. यातून वारक-यांना आनंद तर मिळतोच शिवाय भक्तीमार्गाची आवडही निर्माण होते. ज्याप्रमाणे नाथांनी भारूडाच्या माध्यमातून लोकांना भक्तीमार्गाकडे वळवलं त्याचप्रमाणे या खेळांच्या माध्यमातून, नाचातून वारकरी या वारीचा आनंद घेतात.
पंढरीच्या वारीमध्ये स्त्रियांचा लक्षणीय सहभाग असतो. यंदाही वारीमध्ये खेडोपाड्यातील स्त्रियांसह वकील, डॉक्टर, इंजिनियर्स, कॉलेजियन विद्यार्थिनी अशा अनेक क्षेत्रातील स्त्रिया सहभागी होत असतात. प्रसिद्ध लेखिका अरुणा ढेरे वारीतील या स्त्रियांच्या सहभागावर पुस्तक लिहिताहेत. त्या स्वतःही वारीत सहभागी झाल्यायेत.
First Published: Sunday, June 24, 2012, 14:55