शिक्षकांची मजा, विद्यार्थांना सजा - Marathi News 24taas.com

शिक्षकांची मजा, विद्यार्थांना सजा

झी २४ तास वेब टीम, पुणे
 
जिल्हा परिषदांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन जिल्हा परिषदेच्या शिक्षकांचं अधिवेशन काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं स्पॉन्सर केलं, असा आरोप मनसेनं केला. शिक्षकांच्या या अधिवेशनामुळे राज्यातल्या हजारो शाळा आठवडाभरासाठी बंद आहेत. पुण्यातल्या भोर तालुक्यातल्या केळवडे गावातली  जिल्हा परिषदेची शाळा. सध्या या शाळेच्या वर्गांना कुलुपं लागली आहेत. त्याला कारण ठरलं आहे ते रत्नागिरीत सुरु असलेलं शिक्षक अधिवेशन.
 
या अधिवेशनामुळे राज्यातल्या अडीच लाख शिक्षकांनी शाळांना दांडी मारली. त्यामुळे राज्यातल्या जिल्हा परिषदांच्या हजारो शाळा बंद आहेत. पाच डिसेंबर ते अकरा डिसेंबर अशी तब्बल आठवडाभराची सुट्टी शाळांना देण्यात आली. रत्नागिरीत सुरु असलेलं अधिवेशन म्हणजे निव़णुका डोळ्यासमोर ठेऊन शिक्षकांना चुचकारण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप मनसेनं केला.
 
शिक्षक संघटनांच्या अधिवेशनाला शिक्षकांना पगारी रजा देऊ नये, असा हायकोर्टाचा आदेश आहे. मात्र तो सर्रास धुडकावून विद्यार्थ्यांना वेठीला धरण्यात आलं. जिल्हा परिषदांच्या शाळांच्या दर्जाबाबत आधझीच बोंब असताना सरकार आणि शिक्षक यासंदर्भात किती गंभीर आहे, याचंच हे आणखी एक उदाहरण.

First Published: Friday, December 9, 2011, 16:34


comments powered by Disqus